हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात काल सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर राष्ट्रवादी-भाजप युती होणार का अशी शंका उपस्थित झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही नदीची दोन टोकंआहे. जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना दोन्ही पक्ष एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही, असा खुलासा नवाब मलिक यांनी केला.
मोदी आणि पवार यांच्यामध्ये बँकिंग क्षेत्राबद्दल महत्त्वाची चर्चा झाली. बँक रजिस्ट्री कायद्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सहकारी बँकेच्या अधिकारांवर गदा आली आहे. बँकांचे अधिकार मर्यादित झाले आहेत. कायद्यात सुधारणा केल्यानंतर काही विसंगती आहेत. त्या गोष्टी शरद पवारांनी मोदींना सांगितल्या आणि लक्ष घालण्याचं आवाहन केलं. ही भेट अचानक झालेली नाही. भेट ठरलेली होती. या भेटीबद्दल संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे, असं मलिक म्हणाले.