हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. “उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किमत चुकवावी लागेल असे जेव्हा मोदींच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीकाही पवार यांनी मोदींवर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांच्या आनंदाच्या दृष्टीने आज महत्वाची गोष्ट ठरली आहे. देशातील शेतकऱ्यांना मी सलाम करत आहे. मोदी सरकारने कायदे मागे घेतले हे योग्यच झाले. कायद्यांबाबत सांगायचे झाले तर कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने हे कायदे आणले. त्यामुळे या कायद्याला विरोध झाला. देशाच्या इतिहासात थंडी, ऊन, वारा, पावसाचा विचार न करता शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. पण मोदींनी तसे केले नाही.
उत्तर प्रदेशचा काही भाग राजस्थान, पंजाब हरयाणातील लोक या आंदोलनात होते. आता पंजाब, उत्तर प्रदेशात निवडणुका येत्या काळात होणार आहेत. निवडणूक प्रचारासाठी गावात गेल्यावर शेतकरी जाब विचारतील हे लक्षात आल्यावर मोदींनी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. उशीरा का होईना शहाणपण आले. याचे मी दुःख व्यक्त करीत नाही. मात्र आपल्या न्याय, हक्काच्या मागणीसाठी एक वर्ष संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असे पवार यांनी यावेळी म्हंटले.