समीर वानखेडे यांचे फोन टॅपिंगचे पुरावे लवकरच समोर आणणार; नवाब मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. त्यांच्या बाबतचे अनेक पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेत वानखेडे यांच्याबाबत नवीन माहिती दिली. वानखेडे यांच्या विरोधात मी हळू हळू पुरावे बाहेर काढणार आहे. माझी कागदपत्रे खोटी असतील तर माझ्या विरोधात दावा दाखल करावा. मी लवकरच आणखी फोन टेपिंगचे ठोस पुरावे समोर आणणार आहे. असे मलिक यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जन्म दाखला आम्ही जात पडताळणी समितीसमोर देणार आहोत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल. वानखेडेंच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र दाखवले जात आहे. वडिलांचे प्रमाणपत्र दाखवण्यापेक्षा समीर यांनी त्यांचे स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र दाखवावे.

आपण लवकरच समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक सबळ पुरावे सादर करणार आहोत. समीर वानखेडे यांच्यासारखा व्यक्ती बनावट जन्म तारीख तयार करून शेड्यूल कास्टच्या कॅटेगिरीत नोकरी मिळवतो. त्याच्यामुळे इतरांची संधी हुकली आहे. आम्ही दिलेले बर्थ सर्टिफिकेट खरे आहेत. त्यावर त्याच्या वडिलांचे नाव दाऊद असे आहे, असेही मलिक यांनी सांगितले.