राजकारणाच्या रणातून | प्रफुल्ल पाटील
“राजकारण ही कुणाची मक्तेदारी होता कामा नये आणि जर त्यात मक्तेदारी निर्माण झाली तर इतर समाजघटकांना त्यात सामावून घेतले जात नाही” असे मत “पॉलीटीकल सायन्स” या विषयाचे अभ्यासक ओ.पी .गााबा आपल्या” पॉलिटीकल थेअरी” या ग्रंथात व्यक्त करतात. पुरोगामी असणारा महाराष्ट्रसुद्धा या घराणेशाहीच्या पाशापासून मुक्त नाही. विश्वजित कदम, राजीव सातव, प्रतीक पाटील, प्रिया दत्त, मुकुल वासनिक, नीलेश राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, राजीव राजळे, विजयसिंह मोहिते-पाटील, मनीष जैन, आनंद परांजपे, संजीव नाईक, संजय महाडिक, पूनम महाजन, हीना गावित इत्यादी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय उमेदवारांना घराण्याची राजकीय पार्श्वभूमी आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्याला या घराणेशाहीतून आलेले अनेक लोकप्रतिनिधी बघायला मिळतील. रोहित पवार ,संदीप क्षीरसागर,कुणाल पाटील ही त्यातीलच काही प्रातिनिधिक उदाहरणं. पण २८८ सदस्य संख्या असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेत जवळपास चाळीस टक्के आमदार या घराणेशाहीतून आलेले आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. फक्त विधानसभाच नाही तर लोकसभेपासून, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायट्यांपर्यंत हा घराणेशाहीचा, सरंजामदारशाहीचा लोकशाही या गोंडस नावाखाली बोलबाला आहे. साधी ग्रामपंचायत निवडणूक आली तरी ज्या घराण्याचा गावात, भावकीत दबदबा आहे ते त्यांच्या एका प्रतिनिधीला हमखास निवडणुकीत उतरवतातच. लोकही आदर, भीती किंवा दबावापोटी त्याला निवडून देतात. महाराष्ट्रात राजकीय घराणेशाही सुरू केली ती बाळासाहेब विखे – पाटील यांनी असं मत राजकीय विश्लेषक किशोर रक्ताटे व्यक्त करतात. त्यानंतर मग पवार,ठाकरे,चव्हाण या घराण्यांनीही आपली एक नवी राजकीय इमेज तयार केली. पश्चिम महाराष्ट्र पट्टा जो महाराष्ट्रातला “साखर पट्टा” म्हणून परिचित आहे या परिसराचा अभ्यास केला तर जवळपास सगळेच लोकप्रतिनिधी हे कुठ्ल्या ना कुठल्या घराण्याशी आपले नाते सांगतात. मोहिते-पाटील,निंबाळकर ही घराणी गेली अनेक वर्ष आपला राजकीय दबदबा कायम ठेऊन आहेत. या परिसरात जर निवडून यायचे असेल तर तुमच्याकडे “साखर कारखाना आणि घराणेशाहीचा वारसा” या गोष्टी किमान असाव्याताच अशी एक अलिखित धारणाच आहे.
त्याचबरोबर कोकण परिसरातही नितेश राणे, अदिती तटकरे या नवनिर्वाचित लोकांमध्येही घराणेशाहीचा वारसा आहेच. मराठवाडा अजूनही निजामशाहीच्या मानसिकतेतच आहे का? असा प्रश्न तिथल्या राजकीय परिस्थितीला पाहून पडतो. तुमच्या मागे आडनाव आहे किंवा जातीचा पाठींबा आहे तर तुम्ही सहज त्या ठिकाणी निवडून येऊ शकता. मुंडे,निलंगेकर,देशमुख ही घराणी गेली कित्येक वर्ष या भागात आपला एकहाती दबदबा कायम ठेउन आहेत. एक काळ तर असा होता की या घराण्यांच्या विरोधात उभे ठाकणे म्हणजे देशाच्या विरोधात उभे राहणे असे मानले जात होते.
अशीच काही परिस्थिती विदर्भाच्या बाबतीतही मांडता येईल. विदर्भही घराणेशाही पासून मुक्त नाहीच. काँग्रेसचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार,नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत अशी अनेक उदाहरणे काँग्रेसमध्ये आहेत. राष्ट्रवादीत अनिल देशमुख आणि रमेश बंग हे दोन्ही माजी मंत्री आपल्या मुलांना पुढे आणत आहेत. संघर्षातून ज्यांनी पक्ष बांधला त्या रिपाइंलासुद्धा घराणेशाहीची बाधा झालीच आहे. रिपाइं नेते रा.सू. गवई यांच्या मृत्यूनंतर त्यांची संघटना त्यांचे पुत्र राजेंद्र गवई चालवत आहेत. माजी आमदार जोगेंद्र कवाडे आपले चिरंजीव जयदीप यांना पुढे करीत आहेत.
काँग्रेसच्या घराणेशाहीवर नेहमीच टीका करणारे भाजपा नेते सुद्धा स्वतःची घराणेशाही पुढे रेटण्यात कमी नाहीत. भाजपचे दिवंगत नेते गंगाधर फडणवीस यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी मजल मारली आहे. जनसंघाचे पहिले अध्यक्ष पंडित बच्छराज व्यास यांचे चिरंजीव गिरीश व्यास आमदार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष भाजपचे आमदार झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास करणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे ज्येष्ठ पुत्र सागर विधानपरिषदेत आमदार होते, दुसरे पुत्र समीर आता विधानसभेत आहेत. भाजपचे दिवंगत नेते प्रभाकरराव दटके यांचे पुत्र प्रवीण यांनी महापौरपद भूषविले आहे.
उत्तर महाराष्ट्रातल्या धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा वारसा कुणाल पाटील चालवत आहेत तर जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे हे आपल्या सुनेला आणि मुलीला एक “सेफ”राजकीय करीयर निर्माण करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. नंदुरबार सारख्या आदिवासी पट्ट्यात सुद्धा या घराणेशाहीचा लोण पसरले आहे. नंदुरबारच्या खासदार हिना गावित या विजयकुमार गावितांचा, नवापुरचे आमदार शिरीष नाईक हे सुरुपसिंग नाईक यांचा तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्या मागे वडील माणिकराव गावित यांची राजकीय वारसा पुढे चालवीत आहेत.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रकाश पवार यांच्या मते महाराष्ट्रात ८९ घराणीच राजकारण करत आहेत. इतर कुठल्या नवीन व्यक्तीला यात स्थान मिळवणे खूपच अवघड आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारण हे फक्त जय आणि पराजय या चष्म्यातून बघितले जाते. एकंदरीत निवडणुकांतला वाढलेला खर्च, झालेले गुन्हेगारीकरण यामुळे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारालाच राजकीय पक्षही सहज जवळ करतात आणि लोकही सहज स्वीकारतात ही सत्यपरिस्थिती आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनू शकतो, इंजिनयरच्या मुलाला इंजिनियर बनण्याची मुभा आहे तर मग राजकारण्यांच्या मुलाने राजकारणाची आवड जोपासली तर बिघडलं कुठं या प्रश्नाचं उत्तर आता सामान्य जनतेलाच शोधावं लागणार आहे.