औरंगाबाद | शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून, शहरातील रस्त्याचे कामे होत आहे. या अंतर्गतच मोंढा नाका, जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर या रस्त्याचे काम केले जात आहे. परंतु हे काम करत असताना, रस्त्यात येणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ ठेवत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. परंतु मनपा प्रशासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने रस्ते गुळगुळीत करणे शक्य नव्हते. यामुळे प्रशासनाने रस्त्यांच्या कामाकरिता शासनाकडे निधी मागितला. सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने रस्ते गुळगुळीत करण्याकरिता शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता. यापाठोपाठ सत्तांतर झाल्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारनेही आणखी 152 कोटी रुपये रस्ते गुळगुळीत करण्याकरिता दिले.या अंतर्गत एकूण 23 रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यातील सात रस्ते एम.एस.आर.डी.सी, त एमआयडीसी व नऊ रस्ते मनपा प्रशासनाच्या माध्यमातून केले जाणार आहेत. यातील मोंढा नाका जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर हा सुमारे 950 मीटर लांब आणि तीस मीटर रुंदी असलेला रस्त्याचे काम एमएसआरडीसी कडून केले जात आहे. परंतु रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात असताना, रस्त्यात आलेले खांब जैसे थे ! ठेवत काम सुरू आहे. रस्त्यावर खांब आल्याने अपघात होण्याचा तर धोका आहेच, परंतु नंतर पुन्हा हे खांब हलविण्या करिता रस्ता फोडावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला, संबंधित कंत्राटदार महावितरण कडे पैसे भरून हे खांब हटवणार आहेत. त्या दृष्टीने महावितरण कडे पाठपुरवठा देखील सुरू आहे अशी माहिती ए.बी. देशमुख,
मनपा विद्युत विभाग प्रमुख यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.