हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमेश लटके जिवंत असताना त्यांना किती मानसिक दिला हे त्यांनी मला स्वतः सांगितलं असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठीही भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शन रॅलीत नितेश राणे सहभागी झाले होते तेव्हा त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
नितेश राणे म्हणाले, ठाकरेना आज लटके कुटुंब दिसतंय, पण रमेश लटके जिवंत असताना त्यांना किती मानसिक त्रास दिला हे त्यांनी मला अंगणेवाडीसाठी जात असताना सांगितलं. उद्धव ठाकरे त्यांना भेटायला तयार नव्हते, मातोश्रीवर त्यांचे फोन उचलले जात नाहीत. हे असच तृप्ती सावंत यांच्यासोबत घडले. त्यांनतर त्यांना मातोश्रीवर प्रवेशही मिळत नव्हता, लटके ताईंबद्दल पण हेच घडणार असा आरोप राणेंनी केला.
दरम्यान, ही गर्दी म्हणजे आमच्या मुरजी भाईंच्या कामाची पोहोचपावती आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मुरजी पटेल हे विजयी होतील असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. जनसेवा करणाऱ्या व्यक्तीला भाजपने संधी दिली असून जनता त्यांना मोठ्या फरकाने निवडून देईल असं राणे म्हणाले.