टीम हॅलो महाराष्ट्र | देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला असताना ती भरुन काढण्यासाठीच्या सर्व उपाययोजना हळूहळू अंमलात आणणं सुरु असून महिना अखेरपर्यंत आपण कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. लघुउद्योग चालू करताना लोकांनी महत्त्वाच्या ५ गोष्टींची खबरदारी घ्यावी असंही गडकरी यावेळी म्हणाले. यामध्ये मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, १ मीटरचं अंतर राखून काम करणे, राहण्याची योग्य व्यवस्था करणे आणि खाण्याची योग्य व्यवस्था करणे हे गरजेचं असल्याचं गडकरी पुढे म्हणाले. मुंबई आणि पुण्यातील परिस्थिती गंभीर असली तरी ती लवकरच आटोक्यात येईल असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
अनेक लोक भारताची तुलना इतर देशांच्या लढ्याशी करत आहेत. मात्र हा लढा देशातील सर्वच राज्य आणि केंद्र सरकार जनतेला सोबत घेऊन लढत असल्यामुळे इतर देशांच्या जीडीपीशी भारताची तुलना करण्यात काहीच अर्थ नाही. तूर्तास जनतेसाठी सरकारची तिजोरी खाली करायची वेळ आली तरी ती करण्याची आपण तयारी ठेवली असून जनतेनेही काही दिवस प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
रस्त्यांची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून ही कामं हळूहळू सुरु करण्यात येतील असं सांगतानाच नितीन गडकरींनी देशात कुठेच दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे सुरु करणं धोकादायक असल्याचं सांगितलं. परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे सुरू करणं तूर्तास अवघड आहे असं सांगतानाच मुंबईसारख्या शहरातून देशातील इतर भागांत रेल्वे सोडणं हे कोरोनाचा प्रभाव दिल्लीतील निजामुद्दीन प्रकारणासारखंच वाढवू शकतं असा धोकादायक इशारा नितीन गडकरींनी यावेळी दिला.