पुणे । संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ अर्थात आळंदी हे तीर्थक्षेत्र होय. आळंदी येथे कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वरांच्या पादुकांच्या प्रस्थान सोहळ्याला आता दोनच दिवस राहिले आहेत. दिनांक १३ जुनला ज्येष्ठ वद्य अष्टमीला हा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे. व आळंदीला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त आणि प्रांताधिकारी संजय तेली यांनी प्रतिबंध नियम लागू केला असल्याची माहिती दिली आहे. जर या प्रतिबंधाच्या विरोधात कुणी काही केले तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत न येता घरातूनच संतांचे पूजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्ञानेश्वर माउलींचा प्रस्थान सोहळा हा काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. सध्या सर्वत्र सुरु असणाऱ्या कोरोनाच्या संकटात घरी राहूनच भाविकांनी पूजा करा असे सांगितले आहे. माउलींचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पादुका या मंदिरातील मागील बाजूच्या दर्शनमंडपात ३० जूनपर्यंत ठेवल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे. या काळात देऊळवाडा सर्वसामान्यांसाठी पूर्णतः बंद राहील असे सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.