हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्रजासत्ताक दिनी (Republic Day) पंजाबच्या अमृतसर (Amrutsar) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यावर हातोड्याने हल्ला करून त्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. तर, विरोधी पक्षांनी आम आदमी पार्टी (AAP) सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, ही घटना एका पोलिस ठाण्याजवळ घडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्वाचे म्हणजे, या सर्व प्रकरणानंतर बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayavati) यांनी पंजाबमधील AAP सरकारला घटनेसाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटमधील परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नष्ट करण्याचा आणि त्याला आग लावण्याचा प्रयत्न झाला. पुतळ्यावर हल्ला करणे आणि संविधानाच्या पुस्तकाजवळ आग लावणे हे लज्जास्पद आहे.” त्याचबरोबर, मायावतींनी पंजाब सरकारला घडलेल्या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भाजपचा AAP सरकारवर हल्ला
या घटनेनंतर भाजपनेही पंजाब सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Man) आणि AAP पक्षावर निशाणा साधत, “पोलिस ठाण्याच्या समोरच हा प्रकार घडतो आणि सरकार काहीच करत नाही, हे अक्षम्य आहे,” असे म्हटले आहे. यासह, “इतक्या उंच पुतळ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींनी शिडी कुठून आणली? हा हल्ला आधीच नियोजित होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक राजीनामा द्यावा आणि अमृतसर येथे येऊन आंबेडकर पुतळ्यासमोर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेसचा गंभीर आरोप
भाजप आणि इतर पक्षांबरोबर काँग्रेसने देखील आपवर टीका केली आहे. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन (Ajay Makan) यांनी म्हणले आहे की, “प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते, संविधानाची प्रत जाळली जाते, आणि पंजाब सरकार काहीच करत नाही. यावरूनच AAP सरकारच्या निष्क्रियतेची कल्पना येते.” तर, AAP हा पक्ष देशाच्या एकात्मतेसाठी धोका आहे. पंजाबमध्ये अराजकता आणि कट्टरतावादी प्रवृत्ती वाढत चालली आहे, असा आरोप अजय माकन यांनी लावला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनीही मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप लावला आहे की, “खलिस्तानवाद्यांच्या भीतीने भगवंत मान यांनी फरीदकोटमध्ये तिरंगा फडकवण्याऐवजी पटियालाला पळ काढला. पंजाबच्या इतिहासात अशा प्रकारे भीतीपोटी मुख्यमंत्री पळून गेल्याची घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही.”
महत्वाचे म्हणजे, या घटनेनंतर पंजाबमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दलित संघटनांनी तीव्र निषेध करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. परंतु, प्रशासनाने अद्याप कोणती ठोस कारवाई केलेली नाही, त्यामुळे पंजाब सरकारवरील दबाव वाढत आहे.