Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2756

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड शहरातील जळीतग्रस्त वस्तीची पाहणी

कराड: कराड शहरातील टाऊन हाॅल शेजारील वेश्या वस्तीत काल मध्यरात्री आग लागून सुमारे 25 घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती. या घटनास्थळी आज माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन जळीतग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून आ. चव्हाण यांनी माहिती घेतली

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी तेथील रहिवाशांची विचारपूस केली, या वस्तीमधील लोकांची तात्पुरत्या स्वरूपाची राहण्याची व जेवणाची सोय तातडीने करण्याची व्यवस्था करत उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तश्या सूचना दिल्या. नगरपरिषद प्रशासनाने योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना आ. चव्हाण यांनी दिल्या.

तहसीलदारांनी व मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना हि यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजित गूजर, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, मुख्याधिकारी रमाकांत डाके आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

IRDAI चा नवीन प्रस्ताव, अ‍ॅक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसीचे नियम बदलणार; आता लाइफटाईम्साठी रिन्यूअल करता येणार

नवी दिल्ली । पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसीशी संबंधित नियम लवकरच बदलू शकतात. आता इन्शुरन्स रेगुलेटर IRDAI या दिशेने काम करत आहे. विमाधारकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन विमा नियम बदलण्याच्या योजनेवर रेगुलेटर काम करत आहे. नवीन अपडेटेड नियमानंतर, जर एखाद्या व्यक्तीने कोणताही ब्रेक न घेता आपल्या पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसीचे रिन्यूअल करणे सुरू ठेवले असेल तर इन्शुरन्स कंपन्या आयुष्यात कधीही त्या व्यक्तीच्या पॉलिसीचे रिन्यूअल करण्यास नकार देऊ शकणार नाहीत.

वयाची कोणतीही बंधने असणार नाहीत
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने 16 फेब्रुवारी 2022 रोजी एक्सपोजर ड्राफ्ट इश्यू केला होता. यानुसार, कोणतीही इन्शुरन्स कंपनी पॉलिसीधारकाच्या वयाच्या आधारावर पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्सचे रिन्यूअल करण्यास कधीही नकार देऊ शकणार नाही. एक्सपोजर ड्राफ्टमध्ये इन्शुरन्सशी संबंधित नियमांमधील बदलांशी संबंधित प्रस्तावातही हा प्रस्ताव समाविष्ट आहे.

इन्शुरन्स पोर्ट सोपे होईल
जर एखाद्या पॉलिसीधारकाला त्याची इन्शुरन्स पॉलिसी एका इन्शुरन्स कंपनीकडून दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करायची असेल तर यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्याचाही प्रस्ताव आहे. या अंतर्गत, इन्शुरन्स कंपन्यांना पोर्टेबिलिटी फॉर्म मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत सध्याच्या इन्शुरन्स कंपनीकडून आवश्यक माहिती घ्यावी लागेल, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसीची पोर्टेबिलिटी एका विनिर्दिष्ट कालमर्यादेत सुनिश्चित करणे हे प्रस्तावित दुरुस्तीचे उद्दिष्ट आहे.

सवलत देखील मिळेल
पॉलिसीधारकाच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यास त्याला सवलत देण्यास विमा कंपन्यांनाही प्रोत्साहन देण्यात आले आहे.

हेल्थ इन्शुरन्स आवश्यक आहे
कोरोनाच्या काळात आरोग्य विम्याची गरज समोर आली आहे. हेल्थ इन्शुरन्स तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचे कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून कसे संरक्षण करतो हे महामारीमुळे लक्षात आले आहे.

उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली – पृथ्वीराज चव्हाण

कराड : डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, अश्यावेळी प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नातून ६५ लाख रुपयांच्या निधीमधून वनवासमाची येथील जिल्हा परिषद शाळेचे रूपच पालटून नवीन शाळा बांधण्यात आली आहे या शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात आ. चव्हाण बोलत होते

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* वनवासमाची गावातील जिल्हा परिषदेची जुन्या शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती, गावातील ग्रामस्थांनी मला हि बाब सांगितल्यानंतर तात्काळ तिथे सुसज्ज अशी नवीन इमारत उभारण्यासाठी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. निधी जरी मंजूर झाला तरी शाळेची इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी गावातील ग्रामस्थांचा पुढाकार महत्वाचा जाणवला. अत्यंत सुसज्ज व परिपूर्ण अशी शाळेची इमारत झाली असून या शाळेत अगदी प्रसन्न वातावरणात मुलांना शिक्षण घेता येईल. या शाळेला क्रीडांगण व संरक्षक भिंत सुद्धा असणे गरजेची असल्याने त्या सुद्धा गोष्टी लवकरात लवकर उभारली जाईल व यासाठी माझा पाठपुरावा असेल.

यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले कि,* ज्यावेळी मी कराड कार्यालयात जॉईन झालो त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी माझे स्वागत केले व मार्गदर्शन करताना म्हणाले कि, माझ्या मतदारसंघात कायमच मी जास्तीत जास्त निधी आणला आहे पण भागातील जितक्या शाळा व आरोग्य व्यवस्था आहेत त्या अधिकाधिक वाढविण्याची गरज असून त्याठिकाणी दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासाठीच शिक्षण व आरोग्य यांवर अधिकाधिक भर असला पाहिजे. त्यांचा चर्चदरम्यानचे असे मार्गदर्शन एक जबाबदार लोकप्रतिनिधीची जाणीव करून देऊन गेले. यामुळेच पृथ्वीराज बाबा यांच्या प्रयत्नातून अत्यंत सुसज्ज अशी जिल्हा परिषदेची वनवसमाची येथील शाळा पूर्णत्वास आली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, गट शिक्षणाधिकारी मुजावर मॅडम, कराड दक्षिण काँगेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जि प सदस्या मंगला गलांडे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जि प सदस्या विद्याताई थोरवडे, पं स सदस्य उत्तमराव पाटील, सरपंच बापूराव सुतार, उपसरपंच साधना चव्हाण, सुषमा जमाले, झाकीर मुल्ला, अबिदा भालदार, सुभाषराव चव्हाण, एम पी चव्हाण, सुरेश भोसले, मुबारक भालदार, नवाज भालदार, मधुकर जगदाळे, आदींसह वनवासमाची गावातील ग्रामस्थ व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकदाच गुंतवणूक करून मिळवा 12000 हजार रुपयांची पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIC

नवी दिल्ली । रिटायरमेंटनंतर, जर तुम्हाला आयुष्य सोपे बनवायचे असेल आणि दैनंदिन खर्चासाठी कोणावर अवलंबून राहायचे नसेल, तर तुम्ही LIC च्या जीवन सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकदाच पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर रिटायरमेंटनंतर तुम्हाला आयुष्यभर किमान 12 हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळू शकेल.

ही पेन्शन रक्कम योजनेच्या खरेदी मूल्यावर अवलंबून असते. तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक आधारावर पेन्शन मिळवणे निवडू शकता. हा एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, इमिडिएट एन्यूटी प्लॅन आहे. हा प्लॅन जोडीदारासोबतही घेता येईल. LIC च्या सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

पॉलिसीला दोन पर्याय आहेत
हा एक स्टॅंडर्ड इमिडिएट एन्यूटी प्लॅन आहे.
पॉलिसीधारक दोन एन्यूटी प्लॅनमधून एकरकमी योजना खरेदी करून निवडू शकतो.
पहिल्या पर्यायांतर्गत, विमाधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि त्याच्या मृत्यूनंतर, पेन्शन थांबेल आणि नॉमिनीला खरेदी किमतीच्या 100% रक्कम दिली जाईल.
दुसऱ्या पर्यायांतर्गत, विमाधारक आणि त्याच्या जोडीदारापैकी एकाच्या हयातीपर्यंत पेन्शन दिली जाईल. दोघांच्या मृत्यूनंतर, पेन्शन थांबेल आणि पॉलिसीच्या खरेदी किमतीच्या 100% नॉमिनी किंवा वारसाला दिले जातील.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता
हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे खरेदी करता येईल. 40-80 वयोगटातील लोकं हा प्लॅन खरेदी करू शकतात. या योजनेअंतर्गत, दरमहा किमान 1000 रुपये, तिमाही 3000 रुपये, सहामाही रुपये 6000 आणि वार्षिक 12000 हजार रुपये पेन्शनचा पर्याय आहे.

सहा महिन्यांत सरेंडर करू शकता
पॉलिसी खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांनी सरेंडर केली जाऊ शकते. सरेंडर केल्यावर, खरेदी किंमतीच्या 95 टक्के रक्कम परत केली जाईल आणि पॉलिसीवर कोणतेही कर्ज घेतले असल्यास, ते वजा केल्यावर, उर्वरित रक्कम परत केली जाईल. पॉलिसी खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांनंतर कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला पॉलिसी आवडत नसेल, तर तुम्ही पॉलिसी बाँड जारी केल्यापासून 15 दिवसांच्या आत ती काढू शकता. पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्याच्या बाबतीत, हा फ्री लूक कालावधी 30 दिवसांचा आहे.

देखील माहित
पॉलिसीची किमान खरेदी किंमत किमान वार्षिकी, निवडलेला पर्याय आणि पॉलिसीधारकाचे वय यावर अवलंबून असते. कमाल खरेदी किंमतीवर मर्यादा नाही. एन्यूटी म्हणजे जमा रकमेच्या बदल्यात विमा कंपनी ग्राहकाला ठराविक वेळेच्या अंतराने दिलेल्या रकमेचा संदर्भ देते.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सांगलीच्या जवानाला वीरमरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे जवान 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण शहीद झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. रोमित चव्हाण हे 17 मार्च 2017 रोजी सैन्यात भरती झाले होते. सध्या ते राष्ट्रीय रायफल अंतर्गत 4 महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.

शनिवारी सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास दहशतवादी लपून असलेल्या घराला रोमित आणि त्यांच्या सहकारी जवानांनी वेढा घातला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली होती. वारंवार तसे आवाहन केले. पण दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. एक क्षणही पाऊल मागे न फिरविता रोमित व सहकारी जवानांनीही पुढे चाल करत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एका दहशतवाद्याचा खात्माही केला. पण याचवेळी दहशतवाद्यांकडून झाडल्या गेलेल्या काही गोळ्यांनी रोमित यांचा वेध घेतला. आणि त्यांना वीरमरण आले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री आज मुंबईत; उद्धव ठाकरे- शरद पवारांची घेणार भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी KCR यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. तेव्हा उद्धव यांनी केसीआर  यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण के. चंद्रशेखर राव यांनी स्वीकारले होते.

माहितीनुसार, दुपारी 1 वाजता चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये वर्षा येथे भेट होईल. त्यानंतर तिथेच स्नेहभोजन होऊन दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तसंच देशाच्या राजकीय वर्तुळात देखील हा चर्चेचा विषय आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, के चंद्रशेखर राव आणि शरद पवार यांच्यातील भेट खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपला शह देण्यासाठी बिगर भाजपशासित मुख्यमंत्री एकजूट करत असून आगामी राजकारणाला यातून कलाटणी मिळणार का हे आता पहावे लागेल.

प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईनेच नऊ वर्षीय मुलाचा घोटला गळा

औरंगाबाद – ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी’ असे म्हटले जाते. आईची माया शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. परंतु, वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे चक्क आईनेच आपल्या नऊवर्षीय काळजाच्या तुकड्याची प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे आठ दिवसांपूर्वी मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करून तिने पोलिसांत तक्रार दिली होती. सार्थक रमेश बागूल (वय नऊ, रा. भिंगी रोड खंडाळा, ता. वैजापूर) असे मृताचे तर संगीता रमेश बागूल (वय 34, रा. खंडाळा) आणि साहेबराव पवार (वय 56, रा. सावतावाडी खंडाळा) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सार्थकचे अपहरण झाल्याची वैजापूर पोलिसांत 11 फेब्रुवारीला संगीता व साहेबराव यांनी तक्रार दिली होती. दरम्यान, शुक्रवारी तलवाडा शिवारात कुजलेल्या अवस्थेत एक मुलाचा मृतदेह सापडल्याने शिऊर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे फुगल्याने व उग्र वास सुटल्याने पोलिसांनी घटनास्थळी लोणी खुर्द आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना बोलावून जागेवर शवविच्छेदन केले. नंतर दफनविधी करण्यात आला. दरम्यान, रात्री घटनास्थळावर मुलाचे काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या मुलाची ओळख पटली.

शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती, तहसीलदार राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी तलवाडा शिवारात जेसीबीने पुन्हा खड्डा करून सार्थकला ज्या ठिकाणी पुरण्यात आले होते त्या ठिकाणी मृतदेह बाहेर काढून आई, वडिलांकडून ओळख परेड घेतली. त्यावेळी हा सार्थक असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना पहिल्या दिवसांपासून सार्थकची आई आणि तिच्या प्रियकरावर संशय होता. त्यामुळे संगीताला ताब्यात घेऊन खाकी हिसका दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. साहेबराव यांनी सार्थकला दुचाकीवर बसवून तलवाडा शिवारात आणले व गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर संगीताचा प्रियकर साहेबराव याने विष घेतले. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. संगीताला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या मुलाच्या आईवर आणि प्रियकरावर वैजापूर पोलिस ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीचे भोंदू बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद – पती-पत्नीमधील वाद मिटवण्याची थाप मारून विधी-पूजाच्या नावाखाली रुमालात ठेवलेले साडे पाच तोळ्यांचे दागिने हातचलाखीने लांबविणाऱ्या परप्रांतीय भोंदू जोडप्याला उस्मानपुरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई वाळूज भागात शुक्रवारी करण्यात आली. अबीद रशीद आणि नगिना खान अशी अटकेतील भोंदूची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाकेरा वजीर शेख या 5 फेब्रुवारीला कपडे खरेदी करण्यासाठी शहागंज भागात आल्या होत्या. कपडे खरेदी करत असताना त्याना एक छापील पत्रक दिसले. त्यावर पती-पत्नी, कौटुंबिक वाद नये होऊ नये यावर रामबाण उपाय अशी जाहिरात होती. त्यावर क्रमांक होता. म्हणून शाकेरा यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी नागिना हिने त्यांना समस्या विचारली. त्यानंतर पूजा- विधी करावे लागतील. त्यासाठी सोबत दागिने घेऊन या असे म्हणत उस्मानपुरा भागातील जामा मस्जिद समोरील आलिशान कॉम्प्लेक्सच्या गाळा क्र. 2 येथे भोंदूनी बोलावून घेतले. 6 फेब्रुवारीला शाकेरा या तिथे गेल्या. त्यावेळी त्यांच्याकडून सर्व वयक्तिक, पारिवारिक माहिती भोंदूनी विचारून घेतली. पती-पत्नीमध्ये वाद होऊ नयेत म्हणून उपाय म्हणून एक विधी करण्यास सांगितले. त्यासाठी भोंदूनी जमिनीवर एक रुमाल अंथरला. त्यावर शाकेरा यांना दागिने ठेवण्यास सांगितले. त्यानुसार शाकेरा यांनी दोन तोळ्यांचे गंठण, तीन तोळ्यांचे दोन नेकलेस आणि पाच ग्रॅमचे कर्णफुले त्या रुमालात ठेवले. त्या रुमालाला भोंदूनी गाठ मारली. मात्र, त्यापूर्वी हातचलाखीने सर्व दागिने लांबवून रुमलावर तांदूळ, धागा ठेवला. तो रुमाल सकाळी घरी गेल्यावर उघडा असे सांगितले. त्यानंतर शाकेरा या घरी निघून गेल्या. दुसऱ्यादिवशी रुमाल उघडून पाहिले तर त्यात गव्हाच्या पिठाचा गोळा होता. दागिने दिसून आले नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाझियाबाद, दिल्ली येथून अबीद रशीद आणि नगिना खान हे दोघे भोंदू औरंगाबादेत आले. त्यांनी उस्मानपुरा भागातील जामा मस्जिद समोरील आलिशान कॉम्प्लेक्समध्ये गाळा किरायाने घेतला. त्यासाठी दोन हजार रुपये मालकाला ऍडव्हान्स दिले. तसेच रिक्षा, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी कौटुंबिक, पती-पत्नी मधील वादावर रामबाण उपाय अशी जाहिरात पत्रके मोठ्याप्रमाणात वितरित केली. त्यानंतर शाकेरा या शहागंज येथे कपडे खरेदी करत असताना ते पत्रक पाहून संपर्क केल्याने भोंदूच्या जाळ्यात अडकल्या. त्यांचे दागिने लुटून दोघेही गाझियाबादला पसार झाले होते.

“आजही रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज” – डाॅ.अविनाश भारती

हॅलो महाराष्ट्र  | परभणी प्रतिनिधी

भारताच्या इतिहासात अनेक राजे-महाराजे होऊन गेले. परंतु आजही रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. जिजाऊमासाहेबांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केले. त्यांचा इतिहास केवळ वाचल्याने चालणार नाही,तर त्यांच्या विचारांचे आचरण विशेषतः तरुण पिढीने केले पाहिजे, शिवजयंतीच्या निमित्ताने मनाशी निर्धार करावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे, स्त्रियांचा आदर व सन्मान हा शिवरायाच्या स्वराज्याचा कणा होता, स्त्रियांशी झालेले गैरवर्तन त्यांनी कधीही खपवून घेतले नाही प्रसंगी स्वकीयांना सुद्धा कठोर शिक्षा दिली.

शेतकऱ्यांची मुलं स्वराज्यासाठी आपला प्राण तळहातावर घेवून उभे होते,याचं कारण म्हणजे शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले हिताचे कायदे हे होते. शेतकऱ्यांच्या पिकाच्या मोडाला साधे नुकसान जरी पोहोचले तरी त्याची गय केली जाणार नाही असे फर्माण त्यांनी काढले होते. शिवाजी महाराज कुणा एका जातीपातीचे किंवा कोणा एका धर्मीयांसाठी नव्हते तर त्यांनी अठरापगड जाती धर्माला सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. अविनाश भारती यांनी केले.

दिनांक 19 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सवात व्याख्याते म्हणून ते उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य मा. आ. बाबाजानी दुर्रानी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मुंजाजीराव भाले पाटील, अनिलभाऊ नखाते (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी) सुभाष आबा कोल्हे (मा. सभापती जि. प. परभणी), दादासाहेब टेंगसे (मा. सभापती जि. प. परभणी), एकनाथराव शिंदे (उपसभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, पाथरी), दत्तराव मायंदळे( संचालक, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राजेश ढगे (मा.उपसभापती,पंचायत समिती पाथरी) राजीवजी पामे,अलोक चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी संचालक माधवराव जोगदंड, नारायणराव आढाव, लहूराव घांडगे, अशोकराव गिराम, दगडोबा दुगाणे आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराज यांची जयंती ही सर्व जातीधर्मातील लोक एकत्रित बोलावून मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा मानस आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केला. महापुरुषांच्या जयंती निमित्त समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवावेत व कायद्याचे बंधन पाळून महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात. युवकांनी भारताचा इतिहास जरूर वाचला पाहिजे असे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सौ भावनाताई अनिलराव नखाते (अध्यक्षा, परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , सौ शिवकन्याताई ढगे (मा. सभापती पंचायत समिती पाथरी) व आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथराव शिंदे (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,पाथरी) यांनी तर सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी केले.

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी समुपदेशन कार्यशाळा; HARC संस्थेतर्फे प्रबोधनात्मक कार्याद्वारे शिवजयंती अभिवादन !

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थे तर्फे दि 19 फेब्रुवारी शनिवार रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परभणी येथे 180 किशोरवयीन मुलीसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी 180 किशोरवयीन मुली व शिक्षकांची उपस्थिती होती. या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती एम एम पवार, श्रीमती के पी कांबळे, शीतल अंबिलवादे, श्रीमती एल टी सावळकर, श्रीमती यु ए जोंधळे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना स्त्रियांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस तसेच शाश्वत पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. या समुपदेशन सत्रात 180 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले. शेवटी तितक्याच मुलींची 20 प्रश्नांची स्वयंअध्ययन चाचणी घेण्यात आली.

तसेच ‘मेन्स्ट्रुपेडिया’ या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. “येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ” संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.

कोणतेही शासकीय मदत किंवा मानधन न घेता समुपदेशन करणारी टीम: एचएआरसी संस्थेतील टीम सदस्य डॉ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, कु क्षितिजा तापडिया, प्रा अंजली जोशी, प्रा विशाका हेलसकर या मासिक पाळी समुपदेशन उपक्रमात स्वतःच्या व्यस्त नियोजन सांभाळून शासनाकडून किंवा संबंधित संस्थेकडून कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च न घेता काम करत आहे. एचएआरसी संस्था सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करून लोकसहभागातून मागील 2019 पासून संपूर्ण जिल्ह्यात मासिक पाळी समुपदेशन चे कार्य करत आहे.

पार्श्वभूमी: एचएआरसी संस्थे तर्फे मागील 2019 पासून आजवर संपूर्ण परभणी, हिंगोली, वाशीम व बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 207 शाळेतील 17115 किशोरवयीन मुलींचे मासिक पाळी विषयी समुपदेशन करून 9565 गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले।

मुलींनी परखडपणे व्यक्त केल्या भावना: अनेक विद्यार्थिनींनी स्टेजवर येऊन मनमोकळेपणे आपल्या मनातील प्रश्न, शंका ना केवळ व्यक्त केल्या तर मासिक पाळी विषयीच्या विटाळ, चुकीच्या रूढी, गैरसमज विषयी परखडपणे भाष्य केले व विज्ञानवादी विचार व्यक्त केले। एचएआरसी टीमने त्यांच्या प्रश्नांचे शास्त्रोक्त उत्तराने समाधान केले।

प्रास्ताविक डॉ पवन चांडक यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, मुख्याध्यापक पवार मॅडम यांनी प्रयत्न केले.