Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2826

मोठी बातमी!! लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर आज संध्याकाळी 6: 30 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनतर आता मोदी संध्याकाळी 4:30 पर्यंत मुंबईत दाखल होतील आणि लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.

मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील. त्यांनी आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.

भारतीय संगीताचा आत्मा हरपला : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. “स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली,” असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकर यांच्या सोबतच्या घालवलेल्या क्षणाबाबत फोटो ट्विट केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे.‘

“ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते. तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळाच!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले. त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे, असे ट्विटमध्ये फडणीस यांनी म्हंटले आहे.

देव आणि स्वर्ग आहे की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले. आपल्या हजारो सूमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे असे त्यांनी म्हंटल.

लतादीदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

“लतादीदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला.

अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादीदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘अद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला असेही त्यांनी म्हंटल.

लतादीदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

जागतिक मंदीनंतर FII ने भारतीय शेअर बाजारात केली विक्रमी विक्री

Stock Market Timing

नवी दिल्ली | वाढत्या महागाईच्या काळात भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) विक्री करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची भीती हे यामागचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार उदयोन्मुख देशांमधून माघार घेत आहेत. त्याला त्याला भारतीय शेअर बाजारही अपवाद नाही. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार देशांतर्गत बाजारातून सातत्याने विक्री करत आहेत.

परिस्थिती अशी आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी $10 अब्जांची निव्वळ विक्री केली आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या मते, 2008 च्या मंदीनंतर जगभरातील देशांतर्गत स्टॉकमधून ही सर्वात मोठी एक्झिट आहे. यामध्ये अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने व्याजदर वाढवण्याकडे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, जोखमीची ऐतिहासिक पातळी गाठल्यानंतर आता त्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्तीय आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये $ 4.8 अब्ज पैसे काढले गेले
रिपोर्ट नुसार, वाढत्या व्याजदराच्या भीतीने परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जानेवारी 2022 मध्ये भारतीय शेअर बाजारातून निव्वळ $ 4.8 अब्ज डॉलर्स काढले आहेत. कोणत्याही महिन्यात काढलेली ही दुसरी सर्वात मोठी रक्कम आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सचे विश्लेषक नितीन चंदुका आणि कुमार गौतम म्हणतात की,”सध्याची तीव्र विक्री हे हवामान बदलाचे महत्त्वाचे लक्षण आहे. यापूर्वी 2008 मध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 8-10 अब्ज डॉलर्स काढले होते.”

अधिक परदेशी भागीदारी असलेल्या कंपन्यांमध्ये तेजी येऊ शकते
या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की,”सततची विक्री संपल्याने ज्या कंपन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा आहे, त्यांच्या शेअर्सना दिलासा मिळेल. विशेषतः आर्थिक आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये. या कंपन्यांमध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि इन्फोसिस लिमिटेड यांचा समावेश आहे.” विश्लेषकांचे म्हणणे आहे की,”गेल्या पाच वर्षांतील रिटर्न आणि परकीय चलन यांच्यातील सरासरी मासिक परस्परसंबंध 70 टक्क्यांहून जास्त आहे. ऐतिहासिक पातळीपर्यंत पोहोचण्याच्या जोखमीमुळे, परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा असलेल्या कंपन्यांचे शेअर्स वाढू शकतात.”

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 14 % वाढ, थकबाकीबाबत कोणताही विचार नाही

SIP

नवी दिल्ली | अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) वाढवला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ केली आहे.

मनीकंट्रोलच्या एका बातमीनुसार, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ही मोठी वाढ केल्यानंतर त्यांच्या पगारात बंपर जंप होणार आहे. कर्मचार्‍यांच्या पगारात 3 नव्हे तर थेट 14 टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. DA मधील ही वाढ फक्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) कर्मचार्‍यांनाच मिळणार आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा DA जानेवारीमध्ये रिवाइज करण्यात आला. यापूर्वी कर्मचाऱ्यांना 170.5 टक्के दराने DA मिळत होता, जो वाढवून 184.1 टक्के करण्यात आला आहे.

कोणत्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक यांनी सांगितले की, CPSEs च्या बोर्ड लेव्हल आणि खालील बोर्ड लेव्हल ऑफिसर्सना याचा फायदा मिळेल. या लोकांच्या DA रिवाइज करण्यात आला आहे. आता या सर्व कर्मचाऱ्यांना 184.1 टक्के दराने DA मिळणार आहे.

DA ची थकबाकी मिळेल की नाही? 
महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीबाबत मोदी सरकारकडून एक मोठे अपडेट आले आहे. 18 महिन्यांची DA ची थकबाकी देण्याबाबत कोणताही विचार करण्यात आला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेला DA देण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी सातत्याने करत होते. DA ची थकबाकी देण्याबाबत सरकार विचार करेल, अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना होती, मात्र याआधीही सरकारने अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे.

लतादीदी यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शब्दात मांडणं कठिण : अमित शाह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. “संगीत आणि संगीताच्या पूरक असलेल्या लता दीदींनी आपल्या सुरेल आवाजाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक पिढीचे आयुष्य भारतीय संगीताच्या गोडव्याने भरले आहे. संगीतविश्वातील त्यांचे योगदान शब्दात मांडणे शक्य नाही. त्यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे”, अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिली आहे.

मंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहार. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “लतादीदींचा स्नेह आणि आशीर्वाद वेळोवेळी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. तिची अतुलनीय देशभक्ती, गोड बोलणे आणि सभ्यपणाने ती सदैव आपल्यात राहील.

मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि असंख्य चाहत्यांप्रती शोक व्यक्त करतो, असे ट्विटमध्ये शहा यांनी म्हंटले आहे. दरम्यान, शहा यांनी ट्विटमध्ये लता मंगेशकर यांच्याशी साधलेल्या संवादा वेळीचा फोटोही ट्विट केला आहे.

लतादीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत.

त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती.

काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.  लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लता मंगेशकर या देशाच्या अभिमान, त्या जगातील सातवे आश्चर्य होत्या ; नितीन गडकरींकडून प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची नुकतीच प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. लतादीदींची तब्येत काल अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी “लता मंगेशकर या संपूर्ण देशाच्या अभिमान होत्या. त्या जगातील सातवे आश्चर्य होत्या, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लतादीदी या संगीत युगाचा इतिहास होता. त्यांनी संगीताच्या माध्यमातून भारताचा नाव जगात पोहोचवलं. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केलं. त्यांच्या निधनानं देशाची आणि संगीत क्षेत्राची हानी झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई, गोवा आणि संस्कृतीसाठी त्या जोडलेल्या होत्या. त्या आपल्यामध्ये नाहीत. पण, त्यांचं संगीत आणि त्यांनी गायलेली गाणी आपल्यासोबत असतील. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. त्या आमच्या देशाच्या अभिमान होत्या.

लता मंगेशकर यांनी संगीत आणि गायनाच्याद्वारे देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. त्यांनी 75 ते 80 व्या वर्षी आवाज दिला तरी तो 20 वर्षाच्या मुलीच्या आवाजासारखं त्यांचा आवाज वाटायचा. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांचा संबंध होता. लतादीदी यांचा आधार आम्हाला होता, असे गडकरी यांनी म्हंटले.

मल्टी-ऑर्गन फेल्युअरने निधन

रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोव्हिडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले; लतादीदींच्या निधनाने शरद पवार हळहळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. लता मंगेशकर याना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 27 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केल जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत हळहळ व्यक्त केली.

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्विट करत शरद पवार यांनी आदरांजली वाहिली.

दरम्यान, लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यापासून त्यांना कोरोना आणि न्यूमोनिया ची एकत्र लागण झाली होती. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आज त्याची प्राणजोत मालवली. संगीत क्षेत्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी ही दुःखाची गोष्ट आहे.

एक सूर्य… एक चंद्र… एकच लता; संजय राऊतांकडून आदरांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. लता मंगेशकर याना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 27 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केल जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत लता मंगेशकर याना आदरांजली वाहिली आहे.

एक सूर्य…एक चंद्र…एकच लता… असे ट्विट संजय राऊत यांनी केले. तसेच लता मंगेशकर अमर आहेत असेही संजय राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत यांनी सर्वप्रथम ट्विट करत लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती दिली होती.

दरम्यान, लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यापासून त्यांना कोरोना आणि न्यूमोनिया ची एकत्र लागण झाली होती. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आज त्याची प्राणजोत मालवली.