भारतीय संगीताचा आत्मा हरपला : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. “स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली,” असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकर यांच्या सोबतच्या घालवलेल्या क्षणाबाबत फोटो ट्विट केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे.‘

“ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते. तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळाच!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले. त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे, असे ट्विटमध्ये फडणीस यांनी म्हंटले आहे.