Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2827

एक सूर्य… एक चंद्र… एकच लता; संजय राऊतांकडून आदरांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. लता मंगेशकर याना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 27 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केल जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत लता मंगेशकर याना आदरांजली वाहिली आहे.

एक सूर्य…एक चंद्र…एकच लता… असे ट्विट संजय राऊत यांनी केले. तसेच लता मंगेशकर अमर आहेत असेही संजय राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत यांनी सर्वप्रथम ट्विट करत लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती दिली होती.

दरम्यान, लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यापासून त्यांना कोरोना आणि न्यूमोनिया ची एकत्र लागण झाली होती. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आज त्याची प्राणजोत मालवली.

युग संपले : लता मंगेशकर यांचे निधन

lata mangeshkar

मुंबई | गान कोकीळा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांची मृत्यूशी लढाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल शनिवार पासून त्याच्या तब्बेत बिघडल्याने राज ठाकरे यांनी मुंबईतील ब्रीच कॅंडी हाॅस्पीटलमध्ये जावून भेट घेतली होती. अशातच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युग संपले असे म्हणत लता मंगेशकर यांचा फोटो शेअर केला आहे. लता मंगेशकर यांचे वयाच्या 93 वर्षी निधन झाले. रविवारी सकाळी 8.12 मिनिटांनी निधन झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. लता मंगेशकर याना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 28 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांनी कोरोना वर मात केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच त्यांना आयसीयू मधून बाहेर काढल्याचे देखील समजलं होत. त्यानंतर काल सकाळी त्यांची तब्बेत अचानक बिघडली होती. अखेर त्यांची प्राणजोत मालवली.

 

रॅकेट? : विधान भवनात नोकरीचे अमिष देवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

कराड | विधान भवन मुंबई येथे कार्यालयात शिपाई म्हणून नोकरीला लावतो असे सांगत 3 लाख रुपयांची एकाची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अनिल दत्तात्रय कचरे (रा. मलकापूर, ता. कराड) व प्रमोद सोलापुरे (रा. मुंबई, पूर्ण नाव, गाव माहित नाही) अशी फसवणूक प्रकरणी कोठडी मिळालेल्या संशयित दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश शिवाजी शिंदे (रा. येळगाव, गणेशवाडी, ता. कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यामधील संशयित अनिल कचरे याच्यावर यापूर्वी कराड शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्याकडून या गुन्ह्यात अजूनही तक्रारदाराची संख्या वाढू शकते असे सांगण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश शिंदे यांना मुंबई येथे विधान भवन कार्यालयात नोकरीला लावतो असे म्हणून अनिल कचरे व प्रमोद सोलापुरे यांनी त्याच्याकडे 4 लाख रुपयांची मागणी केली. याप्रसंगी 3 लाख रुपये देतो असे गणेश शिंदे यांनी आई व चुलते वसंतराव शिंदे यांच्या समक्ष सांगितले. त्यावेळी प्रमोद सोलापूरे यांनी ठीक आहे, असे म्हणून 3 लाख रुपयाला नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गणेश शिंदे याने पतसंस्थेत सोनेतारण करत 70 हजार रुपये कर्ज काढले. तसेच मामाकडून 30 हजार रुपये उसने आणले. असे एकूण 1 लाख रुपये आई व चुलते बबनराव शिंदे यांच्या समक्ष अनिल कचरे याच्याकडे दिली, तर राहिलेले 2 लाख रुपये नोकरीची ऑर्डर आल्यानंतर देतो, असे सांगितले.

त्यानंतर गणेश शिंदे यांनी अनिल कचरे व प्रमोद सोलापूरे यांना फोन केला असता त्यांनी विधान भवन मुंबई येथे शिपाई म्हणून रुजू होण्याबाबतची ऑर्डर मुंबई येथे विटी रेल्वे स्टेशनला दिली. त्यावेळी राहिलेली 2 लाख रुपये अनिल कचरे यांच्या जवळ देण्यास प्रमोद सोलापूर यांनी सांगितले. त्यामुळे गणेश शिंदे यांचे वडील शिवाजी मारुती शिंदे यांनी अनिल कचरे यांच्या अकाउंटवर 2 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर नोकरीसाठी गणेश शिंदे यांनी अनिल कचरे व प्रमोद सोलापुरे या दोघांना वारंवार फोन केला असता त्यांनी लॉकडाउन, संचार बंदी असल्याने तुम्हाला हजर करून घेणार नाहीत, असे सांगितले. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होताच तुझे काम होईल, असेही त्यांनी गणेश शिंदे यांना सांगितले.
त्यानंतर जून 2021 मध्ये प्रमोद सोलापुरे यांनी गणेश शिंदेला फोन करून हजर होण्यासाठी मुंबई येथे बोलावले. तेथे प्रमोद सोलापुरे याने गणेशला बीएमसी मुंबई पोस्ट किंवा मंत्रालयात कॅन्टीनमध्ये नोकरी देण्याची ऑफर देत जादा पैशांची मागणी केली. परंतु ज्यादा पैसे देऊ शकत नसल्याने गणेश शिंदे यांनी प्रमोद सोलापूरेची ऑफर नाकारली. त्यावेळी शिंदे यांनी माझ्या अगोदरच्या कामाचे काय झाले ते सांगा, नाहीतर आमचे पैसे परत करा असा आग्रह सोलापुरे याच्याकडे धरला.

त्यावर सोलापूर यांनी तुमचा व्यवहार अनिल कचरे बरोबर झाला आहे, त्याच्याशी बोला असे सांगितले. त्यामुळे गणेश शिंदे यांनी अनिल कचरे याच्याशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेश शिंदे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात अनिल कचरे व प्रमोद सोलापुरे यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी प्रथम अनिल कचरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद सोलापुरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.

…अन् देवगिरी एक्सप्रेस दोन तास अंधारातच थांबली

औरंगाबाद – नगरसोल ते तारुर दरम्यान विद्युतीकरणातील 120 मीटर ओव्हरहेड वायर चोरट्यांनी लांबवली. यामुळे खांबांवर लटकलेली उर्वरित वायर अडकल्याने मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस तब्बल दोन तास अंधारात थांबण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन रेल्वे सुरक्षा बलाने अडकलेली वायर काढली आणि रेल्वे रवाना केली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, हे दोन तास अंधारात गेल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. मनमाड ते परसोडा दरम्यान रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ठिकाणी खांब उभारून ओव्हरहेड वायर टाकण्याचे काम सुरू आहे. त्याबरोबर सिग्नल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी ठिकाणी साहित्य ठेवण्यात आले आहे. परंतु विद्युतीकरणाच्या कामाकडे चोरटे वळले आहेत.

नगरसोल ते तारुर दरम्यान खांबावर टाकलेली ओव्हरहेड वायर चोरून नेण्याचा प्रताप चोरट्यांनी केला. जवळपास 120 मीटर वायर लंपास केली. त्यामुळे उर्वरित वायर खांबावरून थेट रुळावर लटकली. अशा अवस्थेतील ही वायर देवगिरी एक्सप्रेस मध्ये अडकली आणि रेल्वे जागेवरच थांबवावी लागली. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अडकलेल्या वायर्स रेल्वे पुढे गेली असती तर विद्युत खांब कोसळले असते व रेल्वेस मोठा अपघात झाला असता, परंतु रेल्वे तात्काळ थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे नगरसोल ते तारुर दरम्यान ही रेल्वे दोन तास अडकल्याने देवगिरी एक्सप्रेस दोन तास उशिराने धावत होती.

मक्याच्या शेतात ‘चोर-पोलिसांचा’ खेळ ! दोन चोरट्यांना सिनेस्टाईल अटक

औरंगाबाद – रस्त्यावरून पायी चालत जाताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. असे चोरटे अत्यंत शिताफीने येऊन सोनसाखळी अथवा इतर मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढतात. पण औरंगाबादेतील देवगाव रंगारी याठिकाणी महिलाच्या गळ्यातील दागिने हिसकावणं दोन चोरट्यांना चांगलंच महागात पडलं आहे. चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी भामट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्या आहेत.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच आरोपींनी यापूर्वी देखील अशा प्रकारे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगाव रंगारी परिसरात दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली होती. पोत चोरी केल्यानंतर हे चोरटे रस्त्याने पळत होते. दरम्यान पीडित महिलेनं आरडाओरडा केला आणि घडलेला प्रकार आसपासच्या लोकांच्या लक्षात आला.

या घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन चोरट्यांचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू केला. पण चोरटे मक्याच्या शेतात शिरले. याठिकाणी त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चोर पोलिसांचा हा खेळ रंगल्यानंतर पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांनाही मक्याच्या शेतातूनच अटक केली आहे. यावेळी घटनास्थळी अनेक लोकांची गर्दी जमली होती. जवळपास 50 ते 60 जणांनी पाठलाग करत दोन्ही चोरट्यांना पकडलं आहे. चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू होती. काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ देखील तयार केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.

नवी मुंबईत सोसायटीच्या निवडणुकीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी

ghansoli crime

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लवकरच राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. या निवडणुकीचे परिणाम आता स्थानिक सोसायटीच्या निवडणुकांमध्ये दिसत आहे. याचा प्रत्यय घणसोली या ठिकाणी आला आहे. या ठिकाणच्या एका सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण ?
नवी मुंबईतील घणसोली परिसरातील माऊली कृपा या सोसायटीमध्ये संचालकपदाची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत परिवर्तन आणि उन्नत्ती पॅनल आमने सामने आहेत. सोसायटीतील निवडणुकीमुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. या निवडणुकीदरम्यान सोसायटीमध्ये बाहेरून आलेल्या तरुणांनी सोसायटीमधील दिलीप चिकणे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दिलीप चिकणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही मारहाण परिवर्तन पॅनलचे सौरभ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप उन्नत्ती पॅनलकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हि जरी सोसायटीची निवडणूक असली तरी येत्या काळात होणाऱ्या नवी मुंबई मनपाच्या निवडणुका आणि त्यासोबतच या परिसरातील इमारतींचे पुनर्वसन यामुळे निवडणुकीला फार महत्त्व आले आहे. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आहेत. या ठिकाणी घरांच्या पुनर्विकासाचे काम सुरु झाले आहे. पुनर्विकासाचं काम हातून जाऊ नये यासाठी राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. परिवर्तन पॅनल हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मानला जातो तर उन्नत्ती पॅनल हा भाजपचा पॅनल आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनलकडून शुक्रवारी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही गटांत सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

भावाच्या लग्नात हवी ती चप्पल मिळाली नाही म्हणून बहिणीने उचलले ‘हे’ पाऊल

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवरदेवाच्या एकुलत्या एका बहिणीने भावाची वरात निघण्यागोदर विष खाऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच तिचा मृत्यू झाला होता.

काय आहे प्रकरण ?
बहिणीला भावाच्या वरातीत जाण्यासाठी आवडत्या चप्पल घेऊन दिल्या नव्हत्या, म्हणून ती रुसली होती. घटनेच्या दिवशी घरात लग्नापूर्वीचे विधी सुरू होते. घरातील सदस्यांसाठी कपडे आदी वस्तू खरेदी केल्या होत्या. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे वडील मुलीला तिच्या आवडीच्या चपला घेऊन देऊ शकले नाहीत. मात्र वडिलांनी शनिवारी सकाळी चप्पल देण्याचे वचन या मुलीला दिले होते. मात्र या मुलीला घरच्यांचे तिच्याकडे होणारे दुर्लक्ष सहन झाले नाही म्हणून तिने रागाच्या भरात विष घेतले.

विष घेतल्यानंतर या तरुणीला अस्वस्थ होऊ लागले. यानंतर त्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला.घटनेच्या दुसऱ्या दिवशी या तरुणीच्या भावाची वरात निघणार होती. आदल्या रात्री घरात लग्नापूर्वीचे विधी होते. भावाच्या लग्नात तिला हवी तशी चप्पल मिळाली नव्हती. आज तिला चप्पल घेऊन देणार होतो, मात्र त्यापूर्वीच तिने विष खाऊन आत्महत्या केली. अशी माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. छोट्या कारणावरून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आंबेगावमध्ये ऊसाने भरलेली ट्रॉली अंगावर कोसळल्याने सख्ख्या बहिणींचा जागीच मुत्यू

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी या ठिकाणी ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये त्या बसल्या. यानंतर तीव्र उतारावर ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर कोसळून जिजाबाई दुधवडे आणि भिमाबाई गांडाळ या दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. मंचर-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी हद्दीमध्ये हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशा प्रकारे घडला अपघात ?
आंबेगाव येथील निरगुडसर येथील महादू संभू वळसे यांच्या शेतातील ऊस तोडणी झाल्यानंतर ऊस ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आला. यानंतर ऊस विक्रीसाठी घेऊन जात असताना भरलेल्या ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे आणि भिमाबाई यादव गांडाळ या दोघी ट्रॅक्टरमध्ये बसल्या. यादरम्यान मेंगडेवाडी रस्त्याच्या तीव्र उतारावर ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. यावेळी हा ट्रॅक्टर दोघी बहिणींच्या अंगावर कोसळला. त्या दोघीही उसाखाली दाबल्या गेल्या. यामध्ये एका बहिणीचा जागेवरच मृत्यू झाला तर एका बहिणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मेंगडेवाडीतील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील साधारण चार किमी परिसरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. याअगोदरदेखील या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत.

धक्कादायक ! पिंपरीत आपटी बॉम्बबरोबर खेळताना 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पिंपरी – चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवड मधील दिघी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मासे किंवा श्वान मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या स्फोटकाबरोबर खेळत असताना एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे तर तिच्याबरोबर खेळणारी अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव राधा असे आहे तर आरती आणि राजू असे जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत. या लहान मुलांना कचऱ्यातून ही स्फोटके मिळाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मृत मुलीचे कुटुंबीय राजस्थान येथून दिघी या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी आले होते. हे कुटुंबीय जनावरांच्या गोठ्यात काम करतात तर मृत मुलगी व अन्य मुले खेळत होती.

काय आहे प्रकरण ?
पिंपरी- चिंचवडमधील दिघी या ठिकाणी आपटी बॉम्ब फुटल्याने एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोन लहान मुले जखमी झाली आहेत. मृत मुलीचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी राजस्थान येथून दिघी या ठिकाणी आले होते. हे कुटुंबीय जनावरांच्या गोठ्यात काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दरम्यान मृत मुलगी व अन्य मुले खेळत होती. खेळत असताना त्यांना कचऱ्यात बॉलसारखी एक वस्तू दिसली. यानंतर मुलीनी त्या वस्तू घरी आणून गोठ्यामध्ये ठेवल्या.

यावेळी मुले त्या बॉल सदृश्य वस्तूबरोबर खेळत असताना तो बॉल खाली पडला आणि फुटला यामध्ये राधा नावाची चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेत तिच्या सोबत खेळणारी अन्य दोन लहानमुलेही या घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आपटी बॉम्ब ताब्यात घेतले. या परिसरात आपटी बॉम्ब कुठून आला? हा नेमका काय प्रकार आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

‘हरिभाऊ बागडेंनी धोका दिला; दुध संघाची चौकशी लावणार’

औरंगाबाद – हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले असून तीन मराठा नेत्यांनी एकत्र येत एका ओबीसी उमेदवाराचा पराभव केला, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज झालेल्या जिल्हा दुध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समर्थकाच्या पराभवानंतर दिली. यासोबतच दुध संघाची चौकशी लावणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

जिल्हा दुध संघाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. दुध संघात आमदार हरिभाऊ बागडे यांच्या सर्वपक्षीय पॅनलने सर्वच सर्व 14 जागांवर विजय मिळवला. या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांचे नेते एकत्र आले होते. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची होणार याचा अंदाज आला होता. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला होती.

दरम्यान, आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे आमदार हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आमनेसामने आले. भुमरे गटाचे दिलीप निरफळ तर सत्तार गटाचे गोकुळ सिंग राजपूत यांच्यात उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात सत्तार गटाचा पराभव झाला. भुमरे गटाचे निरफळ 9 विरुद्ध 5 मतांनी निवडून आले. समर्थकाच्या पराभवानंतर, एका ओबीसी उमेदवाराच्या पराभवासाठी तीन मराठा नेते एकत्र आले. हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री सत्तार यांनी दिली. तसेच जिल्हा दुध उत्पादक संघाची चौकशी लावणार अशी घोषणाही सत्तार यांनी यावेळी केली. आ. बागडे यांच्या विरोधात फुलंब्री मतदार संघातून किशोर बलांडेंना उभे करणार असेही ते यावेळी म्हणाले.