Monday, December 22, 2025
Home Blog Page 2847

Budget 2022 Tax Exemption : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणारी 10 लाखांपर्यंतची भरपाई करमुक्त असेल

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर केला. इन्कम टॅक्स सवलतीबाबत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची वाट पाहणाऱ्या देशातील करोडो करदात्यांची निराशा झाली. यंदाच्या अर्थसंकल्पातही इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इन्कम टॅक्सची स्थिती आहे तशीच राहिली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याची घोषणा नक्कीच केली आहे. कोविड-19 मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 10,00000 रुपयांपर्यंतच्या भरपाईवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. फक्त यापेक्षा जास्तीची भरपाई टॅक्सच्या कक्षेत येईल.

वास्तविक, सध्या भारतासह संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यात आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसला आहे. सर्व सरकारांप्रमाणे भारत सरकारनेही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक नवीन व्यवस्था केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 मध्ये कोरोना बाधित आणि कोविड-19 संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांना विशेष दिलासा देण्याची घोषणा केली आहे. या नवीन तरतुदींनुसार जर एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना विविध स्रोतांकडून मिळणाऱ्या भरपाईबाबत विशेष घोषणा करण्यात आली आहे. नवीन तरतुदीनुसार, 10 लाख रुपयांपर्यंतची भरपाई टॅक्सच्या कक्षेबाहेर ठेवण्यास सांगितले आहे. भरपाई म्हणून यापेक्षा जास्त रक्कम असेल तरच टॅक्स भरावा लागेल. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नियोक्ता कंपनी, क्राउडफंडिंग किंवा अन्य स्रोतांकडून भरपाई दिली जाते.

उपचारावरील खर्चाबाबतही महत्त्वाची घोषणा यावेळी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नवीन अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार, कोविड-19 च्या उपचारांवर खर्च केलेली रक्कमही टॅक्सच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. यामुळे करदात्यांची निराशा झाली आहे. कोरोनाच्या काळात करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र यावेळी अर्थसंकल्पात त्यांच्या आशा पूर्ण झाल्या नाहीत.

औरंगाबाद- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ शक्य !

औरंगाबाद – देशात येत्या तीन वर्षांत 400 नव्या ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू होणार आहेत. यात औरंगाबाद ते मुंबई ही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होण्याची दाट शक्यता आहे. कारण मनमाड ते औरंगाबाद रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण या मार्चअखेर पूर्ण होईल. त्यामुळे औरंगाबादला नवीन फास्ट वंदे भारत रेल्वे मिळेल, असा अंदाज मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी वर्तविला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत. यात मराठवाड्याला काय मिळेल, याविषयी अद्याप स्पष्टता नसली तरी काही तरतुदींवरून अंदाज बांधला जाऊ शकतो, असे बोरकर यांनी नमूद केले. त्यानुसार स्थानिक उद्योग व्यवसायासाठी ‘एक स्टेशन एक उत्पादन’ योजना होणार आहे. या योजनेचा मराठवाडाभर फायदा होईल. कारण आपल्या रेल्वे मार्गावर शेतीमालाचे तसेच औद्योगिक उत्पादन असणारे बरीच स्थानके आहेत. तीन वर्षांत देशात १०० नवे कार्गो टर्मिनल्स होणार आहेत. यामध्ये औरंगाबाद येथे डीएमआयसी प्रोजेक्ट अंतर्गत व ऑरिक सिटी शेंद्रा बिडकीन येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे औरंगाबाद येथे कार्गो टर्मिनल्स होईल; तसेच आता अंकई ते औरंगाबाद दुहेरीकरण मंजूर झाल्यामुळे येथून मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होईल.

शिवाय 60 किलोमीटरचे आठ ‘रोपवे’ होणार असून यात देवगिरी किल्ला येथील रोपवेचा नक्कीच समावेश झाला असेलच, कारण यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे प्रयत्नशील आहेत, असेही बोरकर यांनी सांगितले. औरंगाबाद येथे मेट्रोची चाचपणी सुरू झाली असून याकरिता डॉ. भागवत कराड यांनी बैठकही घेतली आहे, त्यामुळे वाळूज ते शेंद्रा हा प्रकल्प मंजूर होण्याची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद येथे रेल्वेस्टेशन ते जवाहर कॉलनी, सिडको, टीव्ही सेंटर, बसस्थानक परत स्टेशन या करिता मराठवाडा रेल्वे कृती समितीने नागपूर येथील मेट्रो ऑफिसला प्रोजेक्ट रिपोर्ट पाठविले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला भरीव मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेतील नवी वॉर्डरचना जाहीर झाल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

मुंबईसह इतर ठिकाणी असलेल्या महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर झालेल्या आहरेत. त्यामुळे आता या महानगरपालिकांच्या येत्या काळात निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. यावेळी राज ठाकरे एमआयजी क्लबमध्ये मनसैनिकांना मार्गदर्शन करणारआहेत.

राज्यातीळ महत्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरत आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत असणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरे नेमकी काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Price : अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण, आजची किंमत तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।अर्थसंकल्पाच्या एका दिवसानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात थोडीशी घट झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्या
एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरून 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी आजच्या ट्रेडिंग मध्ये चांदी 0.01 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,351 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 44,900 रुपये
पुणे – 44,900 रुपये
नागपूर – 44,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,980 रुपये
पुणे -48,980 रुपये
नागपूर – 48,980 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4485.00 Rs 4485.00 0 %
8 GRAM Rs 35880 Rs 35880 0 %
10 GRAM Rs 44850 Rs 44850 0 %
100 GRAM Rs 448500 Rs 448500 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4898.00 Rs 4899.00 0.02 %
8 GRAM Rs 39184 Rs 39192 0.02 %
10 GRAM Rs 48980 Rs 48990 0.02 %
100 GRAM Rs 489800 Rs 489900 0.02 %

मुंबईच्या पैशावर केंद्र सरकारची बाजीरावगिरी सुरु, मुंबई महाराष्ट्राची राजधानी हे पाहवत नाही; संजय राऊतांची टीका

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे हे केंद्र सरकारला पाहवत नाही. मुंबईचा अपमान करणे हे कितपत योग्य आहे,” अशी टीका राऊतांनी केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक राज्याचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे तरच देशाचा विकास होईल. मात्र, इतर राज्याचा विकास करत असताना मुंबईवर अन्याय का केला जात आहे. त्याचा अपमान करणे कितपत योग्य आहे. काँग्रेसच्या राजवटीत झाले नाही त्यापेक्षा जास्त ताकदीने मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे.

देशात आर्थिक प्रगतीत मुंबईचे महत्वाचे योगदान आहे. मुंबई देशाला २.५ लाख कोटी रुपये देत आहे. तुम्ही तुमच्या पैशांनी इतर राज्यांचा विकास करा. आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका. प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर अन्याय का केला जात आहे? मुंबई शिवसेनेच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

Stock Market : बाजाराची वाढीसह सुरुवात, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ

Stock Market Timing

नवी दिल्ली । बाजाराची सुरुवात आज वाढीने झाली आहे. निफ्टी 17700 च्या वर उघडला आहे, तर सेन्सेक्स 497.16 अंकांच्या किंवा 0.84% ​​च्या वाढीसह 59,359.73 वर उघडला आहे. बाजाराच्या तेजीमध्ये जवळपास सर्वच सेक्टर्स ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. ऑटो, फार्मा, आयटी, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि रियल्टी शेअर्समध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सेन्सेक्स 512.69 अंकांच्या किंवा 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 59,375.26 वर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, निफ्टी 134.90 अंक किंवा 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 17,700 च्या वर दिसत आहे. निफ्टी बँक 522 अंकांपेक्षा जास्त वाढताना दिसत आहे.

हे शेअर्स ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत
आज सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्स तेजीत आहेत. आज बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे ​​शेअर्स 3.49 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानावर राहिले, यासह टेक महिंद्राच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली जात आहे. त्याच वेळी, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 46 शेअर्स वाढीसह ट्रेड करताना दिसत आहेत. याशिवाय इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, कोटक बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, विप्रो, टायटन आदी कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.

बजटच्या दिवशी बाजार कसा होता ?
अर्थसंकल्पाच्या दिवशीही कालच्या सत्रापासून बाजाराने तेजी कायम ठेवली. सकाळी बाजाराची सुरुवात मजबूत झाली आणि दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतशी त्याची ताकद वाढत गेली, मात्र दुपारी अर्थसंकल्पीय भाषणानंतर बाजार नफावसुली मोडमध्ये गेला आणि एकदाचा सर्व नफा गमावून तो रेड मार्कवर गेला मात्र सेन्सेक्स आणि ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासांमध्ये खरेदीमुळे निफ्टी वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाला.

ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 848.40 अंकांच्या किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 58,862.57 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 237.00 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 वर बंद झाला.

सातारा जिल्ह्यात 519 कोरोना बाधित : टेस्ट वाढल्या, पाॅझिटीव्ह रेट घसरला

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 519 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 11. 89 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 366 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 804 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 12 टक्क्यांवर आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी दिवसभरात 1537 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 5219 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 391 रूग्ण रूग्णालयात उपचारार्थ आहेत. रिकव्हरी रेट 95. 35 टक्के इतकी आहे.

कोरोना लसीमुळे मृत्यू? पित्याने केला हजार कोटींचा दावा

corona vaccine

औरंगाबाद – आपल्या मुलीचा कोवीशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचा दावा करत, औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या एका पित्याने एक हजार कोटींचे नुकसान भरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लस बनवणाऱ्या कंपन्यांनी तसेच सरकारनेही लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आणि मुलीचा मृत्यू झाला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार सोबतच निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. दिलीप लुणावत असे याचिकाकर्त्याचे नाव असून त्यांच्या कन्या डॉक्टर स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात होत्या. स्नेहल यांनी 28 जानेवारी 2019 रोजी लस घेतली. परंतु 1 मार्च 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या दाव्यानुसार कोरोना प्रतिबंधित लसी या संपूर्णता सुरक्षित असल्याचे म्हटले होते. परंतु खोट्या आणि चुकीच्या दाव यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या एइएफआय या समितीने मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्याचेही या याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळावा व इतर लोकांचे प्राण वाचावेत म्हणून आपण ही याचिका दाखल करत असल्याचे लुणावत यांनी म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

निलेश राणे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेबाबतचे संकेत दिले. यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयात पोलिसांसोबत माजी खासदार निलेश राणे यांनी हुज्जड घातली होती. त्यावरून पोलिसांनी निलेश राणे यांच्यासह पाच जणांवर ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान काल कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी नितेश राणे यांना घरी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना थबविले होते. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी वाद घेतला होता.

दरम्यान, नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांना मला कायदा शिकवू नका असेही त्यांनी म्हंटले होते. दरम्यान, यावरून जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270,  तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पोलिसांच्यावतीने निलेश राणे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान दुचाकीची समोरासमोर धडक : मरळी कारखाना येथे एक युवक ठार तर तिघे जखमी

पाटण | तालुक्यातील दौलतनगर- मरळी कारखाना येथे दोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन एक युवक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी अकराच्या दरम्यान घडली. दरम्यान या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी 11 वाजणेच्या सुमारास कारखाना कॉलेजकडून नवारस्ताच्या दिशेने येणारी आणि नवारस्ता कडून ढेबेवाडीच्या दिशेने भरघाव वेगाने जाणाऱ्या दोन मोटार सायकलींची दौलतनगर येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या घटनेत दुचाकी वरील तिघे युवक शेजारील रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरवर जाऊन जोरदार धडकले. यामध्ये प्रविण प्रताप पवार (वय- 18, रा. मुळगाव ठोमसे, सध्या चोपदारवाडी ता. पाटण) हा युवक जागीच ठार झाला. तर हर्षद धनाजी भिसे(वय- 18 रा.नाडे), रोहन शशीकांत शेजवळ (वय- 20, रा. पापर्डे), आणि एकजण (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन यापैकी हर्षद भिसे आणि सुतार यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

एकुलता एक वारस ही हरपला..!

या घटनेतील मृत प्रवीण पवार याचे मूळ गाव ठोंमसे (ता. पाटण) असून गेल्या कित्येक वर्षांपासून तो आपल्या आईसोबत आजोळी चोपदारवाडी येथे राहत होता. आपल्या वडिलांचे ही छत्र हरवल्यामुळे दुर्दैवी प्रवीण हा आपल्या आईच्या आजोळी राहत होता. प्रवीणच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तो आपल्या आईला एकुलता एक असल्याने त्यांच्या घराण्याचा तो एकमेव वारस होता. मात्र काळाने अचानक त्याच्यावर ही झडप घातल्याने दुर्दैवी प्रवीणच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.