Monday, December 22, 2025
Home Blog Page 2848

“आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे मग बोलावे”; अर्थमंत्र्यांची गांधींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे म्हटले. त्याच्या टीकेला आता अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असे सीतारामन यांनी म्हंटले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी काल संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मत व्यक्त केले. “मला त्या लोकांची दया येते जे खूप लवकर प्रतिक्रिया देतात. तुम्हाला ट्विटरवर काहीतरी टिका करायची आहे म्हणून ते बोलतात. हे तुमच्या कामी येणार नाही. त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असा टोला सीतारामन यांनी लगावला.

यावेळी सीतारामन पुढे म्हणाल्या की, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या नेत्याने गृहपाठ न करता अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. त्यांनी प्रथम त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांची काळजी घ्यावी. केंद्राने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या त्यांनी राबवाव्यात. त्यांनी पंजाब, महाराष्ट्र आणि छत्तीसगडकडे लक्ष द्यावे.

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, सरकारने देशातील मध्यमवर्गीयांना दिलासा न देऊन विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षात पुन्हा टीकाटिपण्णी सुरु झाली आहे.

रेल्वेकडून शेतकऱ्यांना गुठ्यांला साडेपाच लाखाचा मोबादला : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या भूसंपादन लढ्यास यश आले आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, सयापूर, पार्ले, हजारमाची, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला मिळावा, यासाठी आंदोलन केले. त्यामुळेच शेतकऱ्यांना रेल्वेकडून गुंठ्याला साडेपाच लाखांचा मोबदला देण्यात येत आहे. हा आंदोलनाचाच विजय आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी दिली.

तालुक्यातील बाबरमाची येथील शेतकऱ्यांच्या रेल्वे बाधित क्षेत्राला एक गुंठ्याला साडेपाच लाखांच्या धनादेशाचे वितरण प्रांताधिकारी उत्तम दिघे, श्री. नलवडे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, मनोज ढाणे, अनिल डुबल, कृष्णा मदने, प्रसाद धोकटे, शंकर आतकरे, अनिल घराळ, योगेश झांबरे, सुनील जाधव या रेल्वे लढ्यातील प्रमुखांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी श्री. नलवडे म्हणाले, “पुणे- मिरज- लोंढा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विस्तारीकरणाचे काम रेल्वे विभागाने जिल्ह्यात 2018 मध्ये सुरू केले. रेल्वे विस्तारीकरणाचे काम सुरू करताना रेल्वेने शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कोपर्डे हवेली, शिरवडे, टेंभू, संजयनगर व कोरेगाव तालुक्यातील विविध गावांतील कामे, संयुक्त मोजणी बंद पाडली.

कोपर्डे हवेलीत राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे बाधितांचा मेळावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांना सध्या रेल्वेकडून साडेपाच लाखांचा गुंठ्याला मोबदला देण्यात येत आहे. हा शेतकरी आंदोलनाचाच विजय आहे.’

रेल्वे दुहेरीकरणांसाठी 23 गावातील जमीन संपादित काम सुरू ः उत्तम दिघे

पुणे ते मिरज येथे रेल्वेच्या दुहेरीकरणांसाठी 23 गावातील जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांना खासगी वाटाद्वारे जमीन खरेदी घेत आहोत. चालू रेडीरेकनर दराच्या पाचपट पैसे देत आहोत. त्याप्रमाणे सदरचे खरेदीखत चालू असल्याचे कराडचे प्रातांधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले.

पर्यटन राजधानीतील पर्यटनस्थळे आजपासून उघडणार

tourist
tourist

औरंगाबाद – पर्यटन राजधानीतील सर्व पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल दिली. कोरोना प्रतिबंधक लसीचा 2 मात्रा घेतलेल्या व ऑनलाइन तिकीट बुकिंग केलेल्या पर्यटकांना पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

शासनाने 1 फेब्रुवारीपासून पर्यटन स्थळ, नॅशनल पार्क, सफारी पार्क, स्पा, सलून बाबत 50% उपस्थितीचे आदेश जारी केले आहेत. पर्यटन स्थळांमध्ये किती प्रमाणात पर्यटकांना प्रवेश द्यावा याबाबत स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहे. 8 जानेवारीपासून पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारी रोजी पर्यटनस्थळांवरील निर्बंध मागे घेण्याचे सूतोवाच केल्यानंतर शासनाने 1 फेब्रुवारी रोजी आदेश जारी केले.

जलतरण तलाव, वाटर पार्क, 50 टक्के क्षमतेने खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट, सिनेमा, नाट्यगृह 50 टक्के ग्राहक दर्शकांचा उपस्थितीत सुरू राहतील. हॉटेल्सच्या वेळा वाढविण्याबाबत जिल्‍हाधिकारी निर्णय घेणार आहेत. भजन व इतर सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम मैदान सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. विवाह सोहळा यांना 25 टक्के उपस्थिती मर्यादा असणार आहे. तसेच आता अंतयात्रेचेसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा पूर्णता हटवण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असलेली संचारबंदी उठविण्याबाबात स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहे. तसेच आठवडी बाजार भरण्याबाबत ही स्थानिक प्रशासनाच निर्णय घेणार आहे.

12 पानी सुसाईड नोट लिहून तरुण व्यावसायिकाने उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील मालाड पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या एका तीस वर्षीय व्यावसायिकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या व्यावसायिकाने आत्महत्या करण्यापूर्वी 12 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने आपण कर्जाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तसेच त्याने त्याच्याकडे कोणाचे किती कर्ज आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे. एवढ्या तरुण व्यावसायिकाने या पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सौरभ पितळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. ते आपल्या पत्नी आणि मुलासह मालाड पश्चिम परिसरात राहत होते. मृत सौरभ यांचे बांगुरनगरमधील विजय इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये इंजिनीअरिंग वर्कशॉप आहे. पण कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे फारसं काम नव्हते. अशात कामासाठी घेतलेल्या 25 लाखांच्या कर्जाचा डोंगर त्यांच्यावर होता. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होते. याच तणावातून त्याने सोमवारी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत सौरभ हे सोमवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यानंतर घरी आल्यानंतर सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. उडी मारल्याचा आवाज येताच सुरक्षारक्षकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सौरभ हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सौरभ पितळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

पेट्रोल न दिल्याच्या रागातून पेट्रोल पंपाची तोडफोड

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने पेट्रोल पंपाची तोडफोड केली आहे. तोडफोड करतानाची घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पेट्रोल न दिल्याच्या रागातून ही तोडफोड करण्यात आली आहे. मध्यरात्री पेट्रोल पंप बंद झाल्यानंतर दोन तरुण पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून संबंधित पेट्रोल पंपावर आले. त्यावेळी त्यांनी वाहानात पेट्रोल भरण्यासाठी सांगितले. मात्र पेट्रोल पंप बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. यामुळे एका तरुणाला राग अनावर झाला आणि त्याने पेट्रोल पंपाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पेट्रोल न दिल्यामुळे झाला वाद
सविस्तर माहिती अशी कि, माजलगाव शहरामध्ये एका पेट्रोल पंपावर दोन तरुण मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी पेट्रोल पंप बंद झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. त्यामुळे एका तरुणाचा राग अनावर झाल्याने त्याने पेट्रोल का दिले नाही अशी विचारणा करत पेट्रोल पंपाची तोडफोड केली. यानंतर काही वेळाने तरुण घटनास्थळावरून निघून गेले. हि सर्व घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पेट्रोल पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
या प्रकरणातील तरुणाची अजून ओळख पटलेली नाही. हि सर्व घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या तोडफोडीमध्ये पेट्रोल पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तरुणाने पेट्रोल भरायच्या नळीने मशीनची तोडफोड केली आहे. यानंतर हे दोघेही त्या ठिकाणाहून निघून गेले.

पोलीस दाम्पत्याचे घरगुती भांडण विकोपाला गेल्याने पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Gadchiroli crime

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमध्ये मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गडचिरोली पोलीस मुख्यालयात शिपाई असणा-या महिलेने सततच्या घरच्या वादाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. तिने विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. विशेष म्हणजे या मृत महिलेचा पतीदेखील पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत आहे. तसेच तिच्या पतीचा हा दुसरा विवाह होता. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव प्रणाली काटकर असे आहे. प्रणाली हिने नव-यासोबत होणा-या सततच्या वादाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद कुमार यांनी सांगितले आहे. मृत प्रणाली आणि तिचा पती हे दोघेही पोलिस मुख्यालयाच्या पोलिस कॉलनीत राहत होते. काल रात्री उशीरा या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला कि प्रणालीने विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

काय आहे प्रकरण ?
मृत प्रणाली काटकर या पोलिस दलात मागच्या आठ वर्षापुर्वी भरती झाल्या होत्या. भरती झाल्यापासून आत्तापर्यंतची त्यांची पोलिस सेवा चांगली राहिली आहे. प्रणाली काटकर यांनी दोन वर्षापुर्वी पोलिस दलातील शिपाई संदीप पराते यांच्यासोबत विवाह केला होता. संदीपचा हा दुसरा विवाह असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. तसेच दोघेही पोलिस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या पोलिस वसाहतीमधील एका इमारतीमध्ये राहत होते. या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचे शेजा-यांनी सांगितले. काल रात्री या दोघांमध्ये जोरात वाद झाला त्या वादातून त्यांनी टोकाची भूमिका घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

पतीचं दुसरं लग्न
पोलिस शिपाई संदीप पराते यांनी दुसरं लग्न का केलं ? किंवा पहिली पत्नी काय करते? पोलीस सध्या या गोष्टीचा शोध घेत आहेत. पोलिस शिपाई संदीप पराते यांनी दोन वर्षापूर्वी मृत प्रणाली काटकर सोबत दुसरं लग्न केलं होतं. या दोन वर्षांमध्ये त्यांच्यात सतत वाद होत होते. हे दोघेही पोलीस असल्याने शेजारच्या पोलिस वसाहतीत राहत होते. याच घरगुती वादाला कंटाळून आरोपीने टोकाचे पाऊल उचलले असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

डिव्हायडरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात, प्रवाशांसह कार थेट पुलावरुन खाली

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी वर्ध्यात पुलावरुन कार खाली कोसळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. हि घटना ताजी असताना वाशिम जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. समृद्धी महामार्गावरील पुलावरुन कार खाली कोसळून हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. कार चालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्यामुळे गाडी पुलावरुन थेट खाली कोसळली.

काय आहे प्रकरण?
वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक समृद्धी महामार्गावरील पुलावरुन कार खाली कोसळून या भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाच मृत्यू तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

कशाप्रकारे घडला अपघात ?
या अपघातामध्ये कार चालकाला डिव्हायडरचा अंदाज न आल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात घडला आहे. वाशीम जिल्हातील दोनद नजीक हा अपघात झाला आहे.

जखमींवर उपचार सुरु
या भीषण अपघातात पुलगांव येथील नानाभाऊ पाटेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर 4 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी अमरावतीच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मुंबई-आग्रा मार्गावर भीषण अपघात! दोघांचा जागीच मृत्यू

धुळे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई -आग्रा महामार्गावर कंटेनर आणि केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅँकरमध्ये भीषण अपघात झाला आहे. हाडाखेड – पलासनेर गावाच्या परिसारामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर टँकरला आग लागून त्यामध्ये ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरचा जळून मृत्यू झाला आहे. या अपघातातील कंटेनरमध्ये काही ट्रॅक्टर होते. ट्रॅक्टरच्या टायरने पेट घेतल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीमुळे संबंधित टॅंकरने देखील पेट घेतला, या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर वाहने संपूर्ण जळून खाक झाली आहेत. या रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून उग्र वास येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यास सुरुवात केली आहे. मात्र हि आग मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवण्यात अडचण येत आहे.

दोघांचा मृत्यू
सविस्तर माहिती अशी कि, इंदूरकडून मुंबईकडे रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. पळासनेर परिसरामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टँकरचा चुराडा झाला तसेच टँकर मोठ्या प्रमाणात आगदेखील लागली. या आगीमध्ये टँकरच्या चालकाचा आणि क्लिनरचा जळून मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची नावे अजून समजू शकली नाहीत.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
स्थानिक नागरिकांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. हा टँकर केमिकल वाहतूक करणारा असल्यामुळे आग लागल्यानंतर टँकरमधून उग्र वास येत होता. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

“नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग, उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प” – मुख्यमंत्री

मुंबई | वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे  अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती परंतू लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

या व याआधीच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेपुढे अनेक स्वप्नं उभी करून त्यांच्यात आशावाद निर्माण केला, प्रत्यक्षात यातील किती स्वप्नं पूर्ण झाली याची स्पष्टता न करता आणखी नवीन स्वप्ने सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातून लोकांसमोर मांडण्यात आली आहेत. परंतू पूर्वीच्या आणि आताच्या स्वप्नांची उद्दिष्ट पूर्तीची कोणतीच दिशा हा अर्थसंकल्प दाखवत नाही.

अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची अर्थविकासाची दिशा देण्यात आल्याचे म्हटले आहे.प्रत्यक्षात केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करतांना २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर देणार हे स्वप्नं ही केंद्र सरकारने दाखवले होते. आज २०२२ साल सुरु झालं आहे,शेतकऱ्यांचे उत्पन्न खरच दुप्पट झाले का, प्रत्येकाला घर मिळाले का याचे कोणतेही उत्तर हा अर्थसंकल्प देत नाही. या आश्वासनपूर्तीला केंद्र सरकार कुठे कमी पडले,  आपण तिथपर्यंत कधी पोहोचणार याची दिशाही यात दाखवलेली नाही. म्हणजे जुनी स्वप्ने विसरुन नव्या स्वप्नांना रुजवण्याचे प्रकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होत आहेत की काय अशी मनात शंका येते.

अर्थसंकल्पात ग्रामीण‍ विकास आणि नरेगाची तरतूद कमी करण्यात आली आहे. यामुळे ना केवळ ग्रामीण भागाच्या विकासात अडचणी निर्माण होतील परंतू नरेगामधून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवरही त्याचा परिणाम होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?

गृहनिर्माण क्षेत्र ज्यात रोजगाराच्या प्रचंड संधी असतात त्या क्षेत्रात परवडणाऱ्या घरांसाठी खासगी विकासकांशी चर्चा करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे  प्रत्यक्षात गृह खरेदीला चालना देणारे निर्णय या अर्थसंकल्पात अपेक्षित होते.  त्याचा कुठलाच उल्लेख अर्थसंकल्पात नाही. ८० लाख घरे बांधणार परंतू ती खरेदी करण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्ये आली पाहिजे याकडे अर्थसंकल्पाने पूर्णपणे डोळेझाक केलेली दिसते.पंतप्रधान आवास योजनेसाठी फक्त ४८ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे, सामाजिक क्षेत्राकडे या अर्थसंकल्पाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

अर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याच्या घोषणेव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे शेती क्षेत्रावरचे अवलंबित्व वाढले आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात हव्या होत्या. शाश्वत सिंचनापलिकडे जाऊन कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास, त्यातून रोजगार निर्मितीचा कार्यक्रम या अर्थसंकल्पातून अपेक्षित होता.

पाच वर्षात ६० लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. स्टार्टअपसाठी  कर सवलत योजना एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. परंतू मुळातच या क्षेत्रातहोणारी गुंतवणूक कमी झाली आहे. आज कोरोनामुळे लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांची स्थिती खुपअडचणीची आहे. अशा परिस्थितीत तरूणांच्या हाताला काम देतांना हा रोजगार निर्मितीचा वेगवाढवण्यासाठीच्या उपाययोजना अर्थसंकल्पात हव्या होत्या.

राज्यांना भांडवली खर्चासाठी दिलेल्या व्याजमुक्त ५० वर्षांच्या कर्जामध्ये चालु वित्तीय वर्षासाठीच्या तरतूदीत केंद्र सरकारने वाढ करून ते १५ हजार कोटी इतके केले आहे.  तसेच पुढील वर्षासाठी ही तरतूद एक लाख कोटी करण्यात आली आहे. याचे स्वागत आहे. मात्र हे कर्ज वाटप करतांना केंद्र सरकारने जाचक अटी लावू नयेत अन्यथा राज्याला या वाढीव मर्यादेचा काही लाभ होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जानेवारी २०२२ मध्ये सर्वोच्च जीएसटी वसुली झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्याचा कोणताही लाभ राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही. वस्तु व सेवा कर वसुली वाढल्याने राज्यांच्या केंद्रीय करातील हिस्सा वाढवणे आवश्यक होते. तसेच वस्तु व सेवा कर नुकसान भरपाईची पाच वर्षाची मुदत आणखी ३ वर्षांनी वाढवून देण्याची राज्य शासनाची मागणी होती. त्यावरही हा अर्थसंकल्प मौन बाळगतो. वस्तु आणि सेवा कराच्या नुकसानभरपाईची राज्यांची मोठी थकबाकी केंद्राकडे प्रलंबित आहे. ती आता राज्याला त्वरीत मिळावी अशी अपेक्षा आहे.  आता उत्पन्नाची स्थिती चांगली झाल्याचा दावा करत असतांना केंद्रीय योजनांमधील कमी होत असलेली केंद्र शासनाची भागीदारी वाढवली जावी, ही मागणीही राज्याने केली होती.

आयकर सवलतीत कोणताही बदल न केल्याने नोकरदार वर्ग नाराज आहे आणि ते स्वाभाविक आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे व वाढत्या महागाईमुळे  कौटुंबिक खर्चाबरोबर आरोग्य खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाची आयकर मर्यादा वाढवून मिळणे आवश्यक होते.

फाईव्ह जी सेवेची सुरुवात होणार असल्याचे सांगतांना अर्थमंत्र्यांनी  ई शिक्षणासाठीच्या अनेक तरतूदी यात मांडल्या. त्या स्वागतार्ह आहेत, परंतू इंटरनेट सुविधा, त्यांची गती ही आज ४ जीच्या काळातही ग्रामीण विद्यार्थ्यांना पाहिजे तशी अनुभवता येत नसल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. केवळ मोबाईल स्वस्त करून चालणार नाही तर इंटरनेट सुविधेचा दर कमी करणे, या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे  गावपातळीवर सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

सत्तारांचा दानवेंना धक्का ! भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेत

Sattar and Danve

औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेने भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यात सत्तारांची सरशी झाली होती. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी दानवेंना आणखी एक जबर धक्का दिला आहे. सोयगाव नगरपंचायतीतील भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सत्तार यांनी शिवसेनेत खेचून आणले. नगरपंचायतीच्या 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता भाजपकडील 6 पैकी चार नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे वळवले आहेत.

यंदाची सोयगान नगरपंचायत निवडणूकीत भाजप आणि शिवसेना आमने-सामने होती. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणुकी प्रतिष्ठेची ठरली होती. अटीतटीच्या या लढतीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने बहुमत मिळवून दानवे यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आणखी डावपेच आखून भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेकडे वळवले. या चार नगरसेवकांचा आता औपचारिक प्रवेश झाला असून लवकरच ही प्रक्रिया अधिकृत होईल.

सोयगाव निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर उर्वरीत दोन नगरसेवकही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. हे सदस्यदेखील शिवसेनेत आल्यास भाजपचे संख्याबळ शून्यावर पोहोचू शकते. भाजपसाठी आणि पर्यायाने दानवेंसाठी ही मोठी नामुष्की ठरू शकते.