Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2983

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. दरम्यान आज ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तो म्हणजे वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणालाही कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना 27 टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. दरम्यान, आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे.

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली आह़े.  ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचे नमूद करत या प्रकरणावर शुक्रवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार न्यायालयाने आज निर्णय दिला आहे.

Share Market : शेअर बाजार तेजीसह उघडला, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ

नवी दिल्ली । शुक्रवार, 7 जानेवारी रोजी शेअर बाजार ग्रीन वर उघडला आहे. संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान, सेन्सेक्स 174.26 अंकांच्या किंवा 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 59,864.48 च्या पातळीवर दिसत आहे. निफ्टी 67.05 अंकांच्या किंवा 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 17,812.95 च्या पातळीवर दिसत आहे.

2022 मध्ये पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजार 6 जानेवारी 2022 रोजी गुरुवारी रेड मार्कवर बंद झाला. निफ्टी 0.99% घसरून 17748.30 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 1.01% किंवा 609.61 अंकांनी घसरून 59613.54 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 0.56% किंवा 210.60 अंकांनी घसरून 37485.30 वर बंद झाला.

टॉप लूजर्स आणि टॉप गेनर्स
UPL, IndusInd Bank, Bajaj Auto, Bharti Airtel आणि Maruti (Maruti) हे गुरुवारी निफ्टी 50 मधील टॉप गेनर्समध्ये आहेत. जर आपण 6 जानेवारी 2022 च्या टॉप लूजर्स बद्दल बोललो तर JSW स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, टेक महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वात मोठी घसरण दर्शविली.

मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता; महापौरांचा इशारा

Kishori Pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आहे.आकडेवारीनुसार ४० ते ४५ टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आढळून येत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना मिनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईतील रुग्णसंख्या चारपटीने वाढत असून हे चिंताजनक आहे. त्यामुळे मिनी लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. परंतु त्यानंतरही रुग्णसंख्या वाढत राहिली. तर आपल्याला पूर्ण लॉकडाऊनचा विचार करावा लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योग्य निर्णय घेतील असेही त्या म्हणाल्या.

मुंबईत ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांच्यावर उपचार करण्यास पालिका सक्षम आहे. मात्र नागरिकांनी काळजीपूर्वक वागावं असेही आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले असून ओमायक्रॉनचा प्रसारदेखील मुंबईत वेगाने होत आहे.

साताऱ्याचा गाैरव : नवी दिल्लीत 26 जानेवारीच्या परेडमध्ये कास पठारचा चित्ररथ

सातारा | नवी दिल्ली येथे 26 जानेवारीसाठी परेडमध्ये चित्र रथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथावर कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरणार आहे.

प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथील परेडमध्ये प्रत्येक राज्याचे चित्ररथ असतात. या चित्ररथामधून प्रत्येक राज्य आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. यंदा दिल्ली येथे होणार्‍या परेडमध्ये राज्याची समृद्ध जैवविविधता दाखवणे या उद्देशाने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. मुख्य मॉडेल कास पठाराचे असेल जे चित्ररथाच्या अग्रभागी मध्यभागी ठेवले जाईल.

कास पठाराला फुलांची व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम घाटावरील जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणून 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को)ने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ घोषित केले होते. हे विविध प्रकारच्या हंगामी वन्य फुलांसाठी आणि स्थानिक फुलपाखरांच्या प्रजातींसाठी ओळखले जाते. कास पठार 10 चौरस किमी परिसरात पसरलेले आहे. फुलांच्या 850 पेक्षा जास्त प्रजाती या पठारावर आढळून येतात. ज्यात ऑर्किड, झुडूप आणि मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. त्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे.

कास पठारा प्रमाणेच मालढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातींचे मॉडेल देखील असणार आहेत. याशिवाय वाघ, फ्लेमिंगो, मासे, गिधाड आणि घुबडाचे मॉडेल असणार आहेत. शेकरू हा राज्यप्राणी तर हरियाल हा कबूतर राज्यपक्षी आहे. ‘ब्लू मॉर्मन’ हे राज्य फुलपाखरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याच्या चित्ररथात फुलपाखराचे आठ फूट उंच आणि सहा फूट रुंद मॉडेल असेल. मॉडेल घेऊन जाणार्‍या स्टेजला जारुल आणि ताम्हण या राज्य फुलांनी सुशोभित केले जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : राजू शेट्टींना धक्का; राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आला असून यामध्ये सत्ताधारी आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे देखील विजयी झाले आहेत. त्यांनी गणपत पाटील यांचा पराभव केला. यड्रावकर यांच्या विजयामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना 98 मते तर गणपतराव पाटील यांना 51 मते मिळाली आहेत. शिरोळ तालुक्यात चुरशीच्या लढतीत अखेर यड्रावकर यांनी बाजी मारली असून त्याचा हा विजय माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

यापूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 15 जागांसाठी मतदान झाले आहे. तर, 6 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, काही जागांसाठी निवडणूक लागली होती. त्याची आज मतमोजणी पार पडत आहे.

क्रांती चौकातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ‘या’ तारखेला येणार

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास साठीचा चौथऱ्यावर काल स्लॅब टाकण्याचे काम करण्यात आले. 15 जानेवारीपर्यंत छत्रपतींचा पुतळा पुणे येथून शहरात येणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.

क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी च्या चौथऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या उंचीच्या समांतर चौथा याची उंची राहणार आहे. पुणे येथील डायरीच्या थोपटे यांच्या स्टुडिओमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या कला संचालनालयाने पुतळ्याची पाहणी केली आहे. मनपाकडून हा पुतळा शहरात आणण्याची तयारी करण्यात येत आहे. सुरक्षेची सर्व तयारी व पोलिस बंदोबस्त घेऊन हा पुतळा बसवण्यात येईल. क्रांती चौक उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत स्मार्ट सिटी च्या माध्यमातून शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामालाही सुरुवात झाली आहे.

दृष्टीक्षेपात पुतळा –
एकूण उंची – 52 फूट
नवीन चौथरा – 31 फूट
पुतळ्याची उंची – 21 फूट
चौथऱ्याचा खर्च – 2.5 कोटी
पुतळ्याचा खर्च – 1 कोटी

भुजबळांनी मला शिकवू नये, उगाच टिमकी वाजवायची नाही; चंद्रकांतदादांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये टीकाटिप्पणी केली जात आहे. मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात अशी टीका नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. त्यावर पाटील यांनी उत्तर दिले असून “आयुष्याची २० ते ३३ वर्षे मी संघटनेसाठी दिली. मी देशभरात प्रवास केला आहे. त्यामुळे भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आहे? उगाच टिमकी वाजवायची नाही,” असे पाटील यांनी पलटवार केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईची ग्रामदैवत मुंबादेवीला जाऊन मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भाजपा युवा मोर्चाच्या बैठकीत बोलताना मी कोणतीही परंपरा नसताना आयुष्यात मोठे व्हायचे आहे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे आयते मिळाले, तसेच तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला परिश्रम करावे लागतील असा संदर्भ होता. आता तेवढेच एक वाक्य काढून बोलायचे असेल तर ठीक आहे”.

माझ्या राजकीय प्रवाशाबद्दल सांगायचे झाले तर माझे वडील ना सरपंच होते ना ग्रामपंचायत सदस्य होते. भुजबळांना काय माहिती आहे? आयुष्यातील ऐन तरुणाईतील १३ वर्ष मी संघटनेसाठी घर सोडले होते. भुजबळ मला माझी टीमकी वाजवण्याची सवय नाही. आम्ही एका वाडीत राहत असल्याने त्यांना ओळखतो. भुजबळांचा जो पालिकेचा वॉर्ड आहे तिथे आजही माझे घर आहे. आयुष्याची २० ते ३३ वर्षे मी संघटनेसाठी दिली. मी देशभरात प्रवास केला आहे. त्यामुळे भुजबळांनी मला शिकवू नये,” असे पाटील यांनी म्हंटले आहे.

शहरातील मेट्रोसाठी करणार पीएमसीची नियुक्ती; प्रशासकांना निर्णय

Mumbai Metro

औरंगाबाद – शहरात मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या महापालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्याची फाईल, लेखा विभागात अडकली होती. लेखा विभागाने या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा, असा शेरा मारून फाईल शहर अभियंता विभागाकडे पाठविली आहे. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता ही फाईल स्मार्ट सिटी अभियानाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडोरमुळे आगामी काळात औद्योगीकरण वाढणार आहे. वाढत्या नागरीकरणासाठी वाहतुकीच्या सोयी-सुविधा पुरविणे गरेजेच आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व नागपूर, नाशिक पाठोपाठ औरंगादेतही मेट्रोसेवा सुरू करण्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात वाळूज ते ऑरिकसिटी या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी मेट्रोचा डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यासाठी पीएमसीची नियुक्ती करण्याची फाईल महापालिकेच्या लेखा विभागात काही दिवसांपासून पडून होती.

आता ही फाईल लेखा विभागाने शहर अभियंता विभागाकडे पाठवीत, पीएमसीसाठी द्यावा लागणारा खर्च महापालिकेला परवडणार नाही. त्यामुळे वरिष्ठस्तराव निर्णय घ्यावा, असा शेरा लिहला आहे. दरम्यान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पीएमसी नियुक्तीची फाईल स्मार्ट सिटीकडे पाठविली आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीने पीएमसी नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. लवकरच मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

थरारक ! जेव्हा धावती ‘मोपेड’ अचानक पेट घेते…

औरंगाबाद – सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ बायपासवर एका धावत्या मोपेडने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून नागरिकांनी तातडीने मदत केल्याने तरुण थोडक्यात बचावला.

वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पंकज अंगद पवार (27) आज दुपारी अहमदनगरहून शेवगावमार्गे गेवराईकडे येत आपल्या मोपेडवरून येत होता. शहराजवळच्या बायपासवर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पंकजच्या मोपेडने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच बायपासवरील दत्तराज हाॅटेलचे मालक संदिप मुळे, किरण घाडगे, माजी नगरसेवक गोरक्ष शिंदे, महादेव मामडे, सचिन मुळे, अनिल रामदासी यांनी धाव घेत तरुणास मोपेडवरून खाली उतरवले.

तेवढ्यात मोपेडला आगीने कवेत घेतले. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोपेड जळून खाक झाली.

औरंगाबादेत कोरोनाने केली ‘शतकांची हॅट्ट्रिक’

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज सलग तिसऱ्या दिवशी शंभराहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 128 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 111 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 257 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 287 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3658 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 28 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 25 तर ग्रामीणमधील 3 रुग्णांना सुटी देण्यात आली.