Friday, January 2, 2026
Home Blog Page 3006

मुंबई-गोवा क्रूझवरील कर्मचाऱ्याला कोरोना, 2 हजार प्रवासी अडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने प्रशासनाच्या वतीने सात दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. या दरम्यान मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 हजाराहून अधिक प्रवाशांना क्रुझवरच थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याने ते त्याठिकाणी अडकून पडले आहेत.

मुंबईहून हि शिप निघाली होती. ती गोव्यातील मुरगाव क्रूझ टर्मिनलवर उतरली होती. शिपवर असलेल्या क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांकडून क्रूझवरील सर्व दोन हजार प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्याचे काम केले जात आहेत. कोरोना झालेल्या क्रू मेंबरला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये संबंधित क्रू कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

दरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन हजाराहून अधिक संख्येत असलेल्या प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास सांगितले आहे. या क्रूझ जहाजाच्या चालकांना वास्कोस्थित साळगावकर मेडिकल रिसर्च सेंटर या हॉस्पिटलमधून सर्व प्रवाशांच्या कोव्हिड-19 चाचण्या घेण्यास सांगण्यात आले आहे.

वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला ‘खांदा’

औरंगाबाद – देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने, संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने खांद्यावर आईची तिरडी घेऊन स्मशानभूमी गाठत अंत्यसंस्कार केले. औरंगाबादच्या हर्सुल परिसरातील ही घटना असून चंद्रभागाबाई आनंदा साखळे (90, मूळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) असे निधन झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्यांना सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) यांनी खांदा दिला.

पोटच्या मुलांनी चंद्रभागाबाईंना वाऱ्यावर सोडले होते. पण तरीही त्या माऊलीला आपल्या तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही ते आईला बघायला फिरकले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच तिने आपले प्राण त्यागले. पोटाला चिमटा घेऊन चंद्रभागाबाईंनी तिन्ही मुलांसह मुलींना शिक्षण दिले. एक मुलगा सेवानिवृत्त कृषी अधिकारी, दुसरा उच्च न्यायालयात क्लर्क, तर तिसरा मुलगा एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहे. पण या मुलांनी सुखाच्या प्रसंगात आईला आपल्यापासून दूर केले. अखेर त्या आईला मायेचा आधार मिळाला, तो औरंगाबाद शहरात राहणारी मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांचा. वृद्धापकाळात आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या उच्चपदस्थ मुलांबाबत नागरिक आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे केले आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात, आजारपणात त्यांनी लक्ष दिले नाही. घरातून हाकलून दिले ती आजारी असताना तिला जिवंतपणी भेटायला आले नाही. इतकेच नव्हे तर मोठा मुलगा अंतिमसंस्कारासाठी ही आला नाही अशा निर्दयी मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर मुलगी सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंत्यसंस्कारावेळी माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह परिसरातील नागरिक, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावधान ! कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय

Corona

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, काल दिवसभरात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 28 तर ग्रामीण भागातील 7 रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे.

काल दिवसभरात 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात मनपा हद्दीतील 20 आणि ग्रामीण भागातील रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 49 हजार 899 झाली असून सध्या जिल्हाभरात 83 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उपचार सुरू असताना गंगापुर तालुक्यातील वडगाव येथील 74 वर्षे पुरुष, तर पैठण तालुक्यातील शेकटा येथील 35 वर्षे पुरुषाचा काल मृत्यू झाला.

आजपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ; शहरात ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

औरंगाबाद – केंद्र सरकारने आज पासून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे जाहीर केले. या लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. 15 ते 18 या वयोगटातील 69 हजार 998 जन असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना शासनाने केली आहे. मागील काही दिवसांपासून लसीकरणाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यातच केंद्र शासनाने मागील आठवड्यात 15 ते 18 वयोगटातील तरुणांना ही लस देण्याचे जाहीर केले. औरंगाबाद महापालिकेने यासाठी नियोजनही केले असून, आज सकाळी 10:30 वाजता लसीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. शहरात सहा ठिकाणी लस दिली जाईल. ऑफलाइन पद्धतीने लस दिली जाणार आहे.

शहरातील मेल्ट्रोन हॉस्पिटल, राजनगर, एमआयटी हॉस्पिटल एन-4, क्रांती चौक, प्रियदर्शनी विद्यालयात लस देण्यात येणार आहे. 69 हजार 998 करून देण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. तर जिल्ह्याला 2 लाख 13 हजार 823 तरुणांना लस देण्याचे लक्ष्य आहे.

पुण्यात ओमायक्रॉंनचा विस्फोट, दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित तर 36 ओमायक्रॉंन रुग्ण

omicron

पुणे : शहरात ओमायक्रॉंनचा विस्फोट झाला आहे. रविवारी दिवसभरात पुणे शहरात ओमायक्रॉंनचा तब्बल 36 रुग्ण सापडले आहेत. तर आज दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

शहरातील कोरोनाबधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकड्यांनी वाढत चालली असून, रविवारी ( दि.२) तब्बल ५२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबधितांची टक्केवारी थेट ७.७ टक्क्यांवर गेली असून, नववर्षाच्या सुरुवातीला होणारी ही वाढ शहराच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ६ हजार ७८६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यापैकी ७.७२ टक्के कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोजच्या मोठया रुग्ण वाढीमुळे, रविवारी शहरातील सक्रिय रुग्ण संख्या अडीच हजारांवर गेली आहे.

गेल्या रविवारी ( दि.२६) ९८१ इतकीच होती. आठ दिवसात यामध्ये दीड हजारने वाढ झाली आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५१४ इतकी आहे. सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण पुण्याबाहेरील आहे.

आतापर्यंत ३८ लाख ७९ हजार ४८७ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ५ लाख ११ हजार १४१ जण बाधित आढळून आले आहेत. यातील ४ लाख ९९ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार ११८ जण दगावले आहेत.

फुटबॉलस्टार लिओनल मेस्सीला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या महाभयंकर विषाणूने आता सर्वच क्षेत्रातील लोकांना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय खेत्राप्रमाणे या कोरोनाच्या नव्ह्या व्हेरियंटने क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंवर हल्ला केला असून फुटबॉलमधील जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी याला कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मेस्सी खेळत असलेल्या पॅरिस सेंट जर्मन क्लबमधील मेस्सीसह चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. पीएसजी संघातील मेस्सीसह इतर खेळाडूंनाही कोरोनाने घातले असून यामधील जुआन बर्नाच, सर्जिओ रिको आणि नथान बीटमाजाला यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बार्सिलोना संघातून पीएसजी संघात आलेल्या मेस्सीने मानाचा ‘बॅलन डी’ओर हा पुरस्कार सातव्यांदा पटकावला होता. सध्या मेस्सी संघासोबत फ्रेंच कप खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यांतर पीएसजी संघात कोरोनाने शिरकाव केला आहे. खेळाडूंसह काही स्टाफ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सीसह संघातील कोरोनाबाधित सध्या विलगीकरणात असून त्यांची योग्य ती काळजी मेडीकल टीम घेत असल्याचे पीसएजी संघाच्यावतीने सांगण्यात आलेले आहे.

लॉबिंग करुन पोस्टिंग करायला ही महाभकास आघाडी आहे का?; भातखळकरांचे मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 25 कोटींचे डील केले आहे. भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे, असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

अतुल भातखळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजींचे सरकार आहे. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? याऊलट आर्यन खान प्रकरणात एसआयटी तपासाचं काय झालं? या एसआयटीने आपली चौकशी का थांबवली? याची माहिती आधी द्या. फर्जीवाडा, फर्जीवाडा नाही तर हा भ्रष्टाचारवाडा आहे.

नेमका काय केला आहे मलिकांनी आरोप ?
आज सकाळी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी अनेक मुद्यांवरून भाजप नेते आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला आहे. असे असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट मलिकांनी केला. तसेच वानखेडे यांना मुदतवाढ द्या. त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल, असेही मलिक यावेळी म्हणाले.

आशिष शेलारांनी लोकांमध्ये आग लावण्याची सुपारी घेतली आहे; महापौरांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारीला मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा केली. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. चार वर्षात मालमत्ता कर माफ का केला नाही? मुंबईकरांवरचे ठाकरे सरकारचे प्रेम हे बेगडी प्रेम आहे, अशी टीका शेलारांनी केली. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिली असून शेलार यांनी मुंबईकरांना भरकटवण्याची आणि लोकांमध्ये आग लावण्याची सुपारी घेतली असल्याचे म्हंटले आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार शिष्य शेलार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, शेलार यांनी मुंबईकरांना भरकटवण्याची आणि आग लावण्याची सुपारी घेतली आहे. ही त्यांची पोटदुखी आहे, म्हणून ते आग लावण्याचे काम करत आहेत. आपण मुंबईकरांना काहीतरी चांगले देत आहोत. भाजपकडे बोलायला काही राहिले नाही, म्हणून शेलार अशा पद्धतीची टीका करीत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने कर माफीची एक घोषणा केली होती. त्यामध्ये त्यांनी कर माफीच्या दृष्टीने अनेक मुद्दे मांडले होते. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरेंच्या घोषणेनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी बिल्डरांना 11 हजार कोटींची मदत केली, त्यावेळी कर माफीची आठवण का झाली नाही? दारू, रेस्टॉरंट यांना मदत केली त्यावेळी मालमत्ता कर माफीची आठवण का झाली नाही? असे अनेक सवाल करीत 4 वर्ष मालमत्ता कर वसूल केला तो मुंबईकरांना परत द्या, अशी मागणी करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शेलार याच्या टीकेला महापौर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास आज भेट दिली तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छता दूतांचा सत्कार करीत त्यांच्याशी संवाद साधला. “कराड शहरातील नागरिकाचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे,” असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले कि, शहरासाठी कचरा व्यवस्थापन हि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. शहराच्या दृष्टीने चांगले आरोग्य राहावे यासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, शहरासाठी स्वच्छ चोवीस तास पिण्याचे पाणी, यासह सांडपाणी नदीला न सोडता त्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयुक्त असा वापर करणे महत्वाचे आहे. शहराच्या महत्वाच्या बाबीसाठी याआधी सुद्धा मोठा निधी आणला होता आता सुद्धा आणला जाईल.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक यांत्रिकी पद्धतीने होण्यासाठी तसेच शहरातील महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, आमिर कटापुरे, झाकीर पठाण, भास्कर देवकर, विजय मुठेकर, अशोकराव पाटील आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सरकारी ताफ्यातील वाहने आता इलेक्ट्रीक असणार; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे यावर चालणाऱ्या वाहनाचे प्रमाण कमी झाले आहे. तर पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये चांगली वाढ होऊ लागली आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकाच्यावतीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्त व्हावा आणि पर्यावरण प्रदूषण टाळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान आता राज्य सरकारमधील गाड्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची मोठी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने घेतल्या या निर्णयाची घोषणा ट्विटच्या माध्यमातून दिली. त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हंटले आहे की, स्वच्छ गतिशीलता आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची बांधिलकी कायम ठेवत, महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2022 ऐवजी 1 जानेवारी 2022 पासून सरकारी / नागरी स्थानिक संस्था / कॉर्पोरेशनसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा किंवा भाड्याने देण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री ठाकरे यांनी दिली.

नववर्षाच्या सुरूवातीलाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठ मोठा निर्णय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला असल्याची माहिती देत राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार आहेत. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार असल्याची घोषणा केली. तसेच प्रदुषण रोखण्याठी पर्यावण मंत्रालयाकडून सध्या ठोस पावले उचलण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणात मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. देशपातळीवरही प्रदुषण रोखण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात येत असल्याचे मंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे.