Monday, December 29, 2025
Home Blog Page 5731

स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावरून मेधा पाटकरांनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे

नवी दिल्ली । कोरोना संकटात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. हातच काम गेल्यानं अनेकांनी घरची वाट धरली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी पैशाअभावी आणि सरकारी प्रक्रियांमध्ये अडचणीत सापडलेल्या मजुरांचे हाल होत आहे. स्थलांतरीत मजुरांची सद्य परिस्थिती पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी स्थलांतरीत मजुरांना घरी सुखरुप आणि सुरक्षित पोहचवण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या मंजुरीवर अवलंबून राहू नये, अशीही या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. शिवाय आपल्या घरी शेकडो मैल अंतर कापत निघालेल्या मजुरांसाठी आश्रय गृह आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचीही मागणी त्यांनी आपल्या याचिकेतून केली आहे.

याचबरोबर तिकीट प्रणालीच्या वापरासाठी एक समान मंच बनवला जावा, स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वेला राज्यांच्या परवानगीची गरज भासू नये, स्थलांतरीत मजुरांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावं आणि लॉकडाऊननंतर या मजुरांसाठी रोजगाराची व्यवस्था करावी अशा इतर महत्वाच्या मागण्याही त्यांनी याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाला केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

हाँगकाँगमधील नवीन कायद्यांतर्गत आरोपींना आता ट्रायलसाठी चीनला पाठवले जाणार नाही: रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले आहे की, हाँगकाँगमध्ये केलेल्या गुन्ह्यांचा आरोप असणार्‍या आरोपीना नवीन सुरक्षा कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी आता चीनला पाठविले जाणार नाही. हाँगकाँगस्थित वृत्तपत्र ‘साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट’ने सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, चीनच्या या नविन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला आता हाँगकाँगच्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये समाविष्ट केला जाईल.

या कायद्याखाली खटल्याला सामोरे जाण्यासाठी आरोपींना सीमेपलिकडे चीनी मुख्य भूमीकडे पाठविले जाणार नाही. हा नवीन कायद्यामुळे चीनच्या सुरक्षा एजन्सींना पहिल्यांदाच हाँगकाँगमध्ये आपली शाखा उघडण्याची परवानगी मिळेल.

हाँगकाँग बार असोसिएशनने म्हटले आहे की,’ चीनमधील हा प्रस्तावित नवीन सुरक्षा कायदा न्यायालयात अडचणीत येऊ शकतो, कारण बीजिंगला यापूर्वी या ब्रिटीश वसाहतीसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता. या कायद्यासंदर्भात हाँगकाँगमध्ये तीव्र विरोध होतो आहे.

रविवारी हाँगकाँगमध्ये या कायद्यासंदर्भात झालेल्या निदर्शनांमध्ये हजारो लोकांनी भाग घेतला. यापूर्वी हाँगकाँग सरकारने नियोजित कायद्यानुसार आरोपींना ट्रायलसाठी चीनकडे पाठविण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. तसेच आंदोलकांनी या शहरातील जनजीवन जवळपास एक वर्ष अस्ताव्यस्त ठेवले.

“या नवीन कायद्यांतर्गत आरोपींविरोधात हाँगकाँगमध्ये खटला चालवावा लागेल,” असे वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. त्यांना ट्रायलसाठी आता चीनच्या मुख्य भूमीवर पाठविले जाणार नाही. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भाजपचे फायर ब्रँड प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात आढळली कोरोनाची लक्षणं; रुग्णालयात दाखल

मुंबई । भाजपचे फायर ब्रँड प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. संबित यांच्याकडून मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, नुकतेचं भाजपमध्ये सामील झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी संबित पात्रा यांच्यासाठी एक ट्विटही केलं. यामध्ये, लवकरात लवकर बरे होण्याची कामना त्यांनी व्यक्त केली आहे. संबित पात्रा यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे.

लवकरच संबित पात्रा यांची कोरोना टेस्ट होऊन त्याचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. या निकालानंतर ते करोना पॉझिटिव्ह आहेत किंवा नाहीत, हे कळू शकेल.उल्लेखनीय म्हणजे, भाजप नेते संबित पात्रा हे स्वत: एक डॉक्टर आहेत. ते हिंदू राव हॉस्पीटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत ते ओडिशाच्या पुरी मतदारसंघातून निवडणूक लढले होते. परंतु, बीजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांना हरवलं होतं. दरम्यान, वृत्तवाहिन्यांवर आपल्या पक्षाची भूमिका मांडताना संबित पात्रा त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘लॉर्ड्स’मध्ये आपल्या खेळाचा जलवा दाखवू न शकलेल्या खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन आणि कोहलीचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीमुळे जगभरात सर्व प्रकारच्या खेळाचे उपक्रम थांबलेले आहेत त्यामुळे सर्व खेळाडू घरीच बसले आहेत. दरम्यान, क्रिकेटची पांढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या बोर्डाने नुकतीच आपली प्लेइंग इलेव्हन टीम जाहीर केली आहे. खरं तर, या मैदानावर गोलंदाजी करताना ५ बळी किंवा शतक ठोकणार्‍या खेळाडूंचा लॉर्ड्सच्या ‘ऑनर्स बोर्ड’ मध्ये समावेश केला जातो. या कारणास्तव अनेक दिग्गजांचा या बोर्डामध्ये समावेश आहे, पण आता लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने अशा ११ खेळाडूंची प्लेइंग लिस्ट तयार केली आहे कि ज्यांनी जगातील प्रत्येक मैदानावर शानदार कामगिरी केली पण लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर मात्र त्यांची बॅट शांतच राहिली आहे. यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, वसीम अक्रम या दिग्गजांची नावे आहेत.

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या ऑनर्स बोर्डमध्ये सामील न झालेल्या या खेळाडूंच्या टीमचा कर्णधार इंग्लंडचा माजी फलंदाज डब्ल्यूजी ग्रेस आहे. त्याने आपल्या २२ कसोटी सामन्यात १०९८ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर वीरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. सेहवागने एकूण २३ कसोटी शतके ठोकली, पण लॉर्ड्समध्ये त्याला एकही शतक करता आलेले नाही. कारकीर्दीत तीन वेळा इंग्लंड दौर्‍यावर आलेल्या विराट कोहलीने अद्यापही या मैदानावर शतक झळकावलेले नाही. त्यामुळे त्यालाही या संघात स्थान देण्यात आले आहे.

 

त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचा क्रमांक लागतो. सचिनने लॉर्ड्स येथे पाच सामने खेळले, परंतु तो येथे जास्तीत जास्त केवळ ४७ धावाच करू शकला. तर, दुसरीकडे लाराने लॉर्ड्स येथे तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्याची येथील सर्वाधिक धावसंख्या ही ५४ होती.

यानंतर जॅक कॅलिसचे नाव येते. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असलेल्या कॅलिसने येथे कधीही शतक केले नाही किंवा त्याने पाच विकेटसही घेतलेल्या नाहीत.

ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलख्रिस्ट या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या सर्वांत जास्त विकेट घेणारा शेन वॉर्न (७०८), वसीम अक्रम (४१४ विकेट) हे देखील लॉर्ड्सवर पाच विकेट घेण्यास असमर्थ ठरले. या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली आणि वेस्ट इंडिजचा कर्टली अ‍ॅम्ब्रोसचाही समावेश आहे.

ऑनर्स बोर्ड ऑफ लॉर्ड्समध्ये कधीही नाव न येणाऱ्या या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन: डब्ल्यूजी ग्रेस (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विराट कोहली, जॅक कॅलिस, अ‍ॅडम गिलख्रिस्ट (विकेटकीपर), शेन वॉर्न, वसीम अक्रम, डेनिस लिली, कर्टली अ‍ॅम्ब्रोस.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट द्वारे केली घोषणा

नांदेड । ४३ वर्षे राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४ हजाराच्या थाटात नेसली. मन लावून काम केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत. अशा अनोळखी प्रांतात मनस्वी रमता येत नाही. म्हणून मी माझा राजकीय प्रवास आता थांबवत आहे, अशी भावूक पोस्ट फेसबुकवर लिहून माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे.

सूर्यकांता पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. भली मोठी राजकीय कारकिर्द असलेल्या पाटील यांचं भाजपमध्ये मन न रमल्याने अखेर त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय फेसबुकवरून जाहीर केला आहे. गेल्या ४३ वर्षात सर्वांनीच सन्मान दिला. अनेक पदे मिळाली. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. आता मला काहीही मिळवायचे नाही. एकटीने सगळं जिंकलंय. लोकांना कंटाळा यावा इतपर्यंत प्रवास करण्याची माझी इच्छा नाही. पण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. तरीही माझा निस्वार्थी प्रवास मला फार समृद्ध करून गेला. त्यामुळे मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे, असं सांगतानाच राजकीय प्रवास थांबवला तरी नव्या पिढीसाठी काम करत राहणारच आहे. घरी बसणार नाही, असं पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.facebook.com/suryakanta.patil.18/posts/1289049537963866

सूर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास
१९८०मध्ये हदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सूर्यकांता पाटील या १९८६मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ३ वेळा हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वही केलं आहे. पाटील यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ४ वेळा खासदार, एकदा आमदार आणि केंद्रीय ग्रामविकास  राज्यमंत्री, संसदीय कार्य राज्यमंत्री आदी विविध पदे त्यांनी भूषिविले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धोनीच्या निवृत्तीबद्दल गॅरी कर्स्टन यांचे मोठे विधान, ‘स्वत: च्या अटींनुसार हा खेळ सोडण्याचा अधिकार त्याने मिळवला’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होत आहे. वर्ल्ड कप २०१९ पासून धोनी भारतासाठी कोणताही सामना खेळलेला नाही, ज्यामुळे बीसीसीआयने त्याला आपल्या वार्षिक करारामधून वगळले आहे. अनेक दिग्गजांचे असे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणे हे धोनीसाठी आता अवघड आहे, मात्र भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन ज्याच्या नेतृत्वात भारताने २८ वर्षानंतर २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता, त्याचे असे म्हणणे आहे की, धोनीने आपल्या अटींवर हा खेळ सोडण्याचा अधिकार मिळविला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गॅरी कर्स्टनने धोनीविषयी बोलताना सांगितले की “एमएस धोनी हा एक अविश्वसनीय क्रिकेटपटू आहे. त्याची बुद्धिमत्ता, शांतता, ताकद, अ‍ॅथलेटिक्स, वेग आणि एक मॅच विनर हे गुण त्याला इतरांपेक्षा वेगळा खेळाडू बनवितात आणि म्हणूनच तो या आधुनिक युगातील सर्वात महान खेळाडूंमध्ये गणला जातोय. “

गॅरी पुढे म्हणाला, “त्याने स्वत: च्या अटीनुसार हा खेळ सोडण्याचा अधिकार मिळविला आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा कोणीही त्याविषयी बोलू नये.”

२०११ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने श्रीलंकेला अंतिम सामन्यात ६ गडी राखून पराभूत केले. यासह २८ वर्षांचा दुष्काळ संपवून भारताने विश्वचषक जिंकला. या वर्ल्ड कपच्या प्रवासाविषयी बोलताना गॅरी म्हणाला, ” भारतीय खेळाडूंसमवेतचा माझा हा एक चांगला प्रवास होता तसेच या वर्ल्ड कपच्या काही चांगल्या आठवणीही माझ्याकडे आहेत. विश्वकरंडक जिंकण्याची खेळाडूंकडून बरीच अपेक्षा होती आणि त्यांनी ते उत्तम प्रकारे हाताळले. ”

गॅरीने दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात मिळून १४,००० हून अधिक धावा केल्या आहेत, पण कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे हे अधिक आव्हानात्मक आहे असे त्याला वाटते. गॅरी म्हणाला, ” क्रिकेट खेळणे अधिक आव्हानात्मक होते. मला भारतीय संघाचा प्रशिक्षक होणे आवडत होते. माझ्या आयुष्यातील हा एक मोठा विशेषाधिकार होता.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईत आता ऑनलाईन पद्धतीने रुग्णांना बेडची नोंदणी करता येणार

मुंबई । मुंबईत रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही बेड उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांना मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता डॅशबोर्ड तयार केला आहे. रुग्णांनी आता थेट रुग्णालयांत न जाता १९१६ या क्रमांकावर कॉल करावा. तिथे डॅशबोर्डवर नोंद झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने १ ते २ तासांत बेड उपलब्ध करून दिले जात आहेत, असं महापालिकेनं म्हटलं आहे.

कोरोना रुग्णांसाठी जास्तित जास्त बेड तयार केले जात असून त्यापैकी ५० टक्के बेड ऑक्सिजनचे असतील यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. तसेच लक्षणं नसलेल्या कोविड रुग्णांनी घरी वेगळी व्यवस्था असेल तर घरीच राहावे. त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. ज्यांच्या घरी व्यवस्था आहे, त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत.

दरम्यान, मुंबईत डॉक्टर आणि अन्य प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यासाठी कोविड योद्धा भरती केली जाणार आहे. याशिवाय केरळमधून डॉक्टर आणि नर्स आणण्याचाही विचार राज्य सरकारने केला आहे. याशिवाय राज्याच्या ग्रीन झोनमधील डॉक्टरांनाही मुंबईत आणण्यासाठी तयारी महापालिकेने सुरु केली आहे. तसेच डॉक्टरांची भरतीही सुरु केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांची कंपन्याना धमकी

वाशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया कंपन्यावर भडकले आहेत. ट्रम्प यांचे ट्विट फॅक्टचेकअंतर्गत ट्विटरकडून अधोरेखित केल्यानंतर सोशल मीडिया कंपन्या आणि विशेष म्हणजे ट्विटरवर ते चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना चांगलीच शिस्त लावण्याचा आणि तसं न झाल्यास या कंपन्या बंद करण्याची धमकी ट्रम्प यांनी ट्विटरवर दिली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी एकमागोमाग एक काही ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

आपल्या ट्विटला फॅक्टचेक अंतर्गत अधोरेखित करत ते दिशाभूल करणारे असणं म्हणणं म्हणजे एक प्रकारे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणंच आहे, असं म्हणत ही कार्यपद्धती तातडीने बदलण्याची मागणी ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी सोशल मीडिया कंपन्यांना हा इशारा दिला असला तरीही या कंपन्यांच्या भविष्याविषयीचा निर्णय घेणं हे त्यांच्या हाती नसल्याचंच प्रत्यक्षात स्पष्ट होत आहे.

मुळात या कंपन्या सार्वजनिक तत्त्वांवर चालत असून त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या बहुतांश सुविधांचा कोट्यवधी नागरिक उपभोग घेत आहेत. संपूर्ण जगभरात या सोशल मीडिया कंपन्यांचं जाळं विविध मार्गांनी पसरलं आहे. त्यामुळं ट्रम्प यांचा हा इशारा नेमका कोणत्या बळावर आहे, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. मुख्य म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडिया कंपन्यांना धमकावणाऱ्या ट्रम्प यांनी कोणत्याही माध्यमाचा उल्लेख करणं टाळलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

हिंदुस्थान फीड्सला नक्की झालंय तरी काय ? काम करा, नाहीतर निघून जावा; व्यवस्थापनाची जबरदस्ती उघड

टीम हॅलो महाराष्ट्र | साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत अडकलेले कामगार वारंवार फोन करुन कंपनीत सुरक्षित वाटत नसल्याचं सांगत आहेत. बिहारमधील या कामगारांना सोडण्यासाठी कंपनी काय प्रयत्न करतेय याविषयी कोणतीच माहिती कंपनीकडून दिली जात नसल्याने हिंदुस्थान फीड्सचं नक्की चाललंय काय? हा सवाल उपस्थित झाला आहे.

२ दिवसांपूर्वी साताऱ्यातील हिंदुस्थान फिड्समध्ये कामगारांना आपल्या गावी जाऊ देत नसल्याच्या बातमी समोर आली होती. या बातमीनंतर पोलीस प्रशासनाने कंपनीची अधिकृत भूमिका समजून घेतली होती. यानुसार १ तारखेला ट्रेन सुरु झाल्यानंतर या कामगारांना परत पाठवण्यात येईल असं कंपनी प्रशासनातर्फे बुधवारी सांगण्यात आलं. यानंतर गुरुवारी सकाळी या ठिकाणच्या कामगारांना इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या कामगारांना नक्की कुठं पाठवलं जातंय, गाडी नंबर काय आहे हे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाच्या सुचनेवरून गेटवरच अडवणूक करण्यात येत आहे. कंपनीला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीतील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून दमदाटीचा प्रकार करण्यात आला आहे.

 

यानंतर घाबरलेल्या कामगारांनी स्वतः संबंधित घटनेचा व्हिडियो शूट करुन आमची सुटका करण्याची मागणी केली आहे. तुम्ही १ तारखेला जाणार असलात तरी आता कामावर रुजू व्हा, अन्यथा चालते व्हा असं कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं कामगारांनी स्वतः नमूद केलं. पोलीस निरीक्षक मांजरे यांच्याशी संवाद साधला असता, कामगारांना इतरत्र हलवलं जात असल्याची काहीच कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं.

कंपनी प्रशासनाशी संवाद साधुन कामगारांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्याचा प्रयत्न हॅलो महाराष्ट्रकडून करण्यात येत असून कंपनीमार्फत मात्र काहीच उत्तर दिलं जात नाही. मॅनेजर श्री. फडके यांना २ दिवसांत तब्बल ८ ते १० कॉल केल्यानंतरही त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. कामगारांना असुरक्षित वाटत असल्याने या प्रकरणात तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

अक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५०० जणांच्या खात्यात टाकले पैसे

मुंबई । कोरोनाच्या संसर्गामुळं मुंबईतील चित्रपट उद्योग ठप्प पडला आहे. सिनेसृष्टीत चित्रीकरण बंद असल्यानं अनेक जणांवर उपासमारीचे वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, सर्वजण आपल्या परिने काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मदत करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी आघाडीवर आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा खिलाडी अक्षय कुमार रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांच्या मदतीला धावून आला आहे.

अक्षयनं तब्बल १५०० ज्युनिअर आर्टिस्ट यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये ३ हजार रुपये जमा केले आहे. सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे सीनिअर ज्वॉइंट सेक्रेटरी व अभिनेते अमित बहल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळं कामगार आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांच्यासमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे.

त्यामुळं यांच्या मदतीसाठी सिनेसृष्टीतील अनेक मंडळी पुढं आले आहेत. याच संदर्भात अक्षयला कळताच त्यानं तत्काळ मदत जाहीर केली. सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननं अक्षयला १५०० ज्युनिअर आर्टिस्टची यादी पाठवली. त्यानंतर त्यानं लगेचच या आर्टिस्टच्या अकाऊंटवर प्रत्येकी ३००० रुपये पाठवले. कोरोना संकटात याआधीही अक्षयनं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटी त्यानंतर मुंबई पालिकेला ३ तीन कोटींची मदत केली. अक्षय इतक्यावरच थांबला नाही. तर त्यानं पोलिस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील थेट मदत केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”