Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5809

रेल्वेने केली फक्त ३ तासांत १० कोटींची कमाई

नवी दिल्ली । लॉकडाउनमुळे देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. आजपासून ही सेवा सुरु होत आहे. यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. त्यानुसार, सोमवारी ११ मे रोजी केवळ ३ तासांत ५४,००० प्रवाशांपैकी ३०,००० तिकिटं बुक झाली. विशेष म्हणजे या बुकिंगमधून रेल्वेला १० कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे.

काल सोमवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हजारो लोक इच्छित स्थळी जाण्यासाठी तिकीट बुकिंगासाठी वेटिंगवर होते. लोकांनी ऑनलाइन बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या साईटवर संध्याकाळी ४ वाजता एकच गर्दी केल्यानं ती क्रॅश झाली. त्यामुळे पुन्हा २ तास उशीरानं म्हणजेच संध्याकाळी ६ वाजता बुकिंगला सुरुवात झाली. दरम्यान, बुकिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत हावडा-नवी दिल्ली रेल्वे गाडीची सर्व तिकीट बुक झाली. ही रेल्वे आज (मंगळवार) संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी सुटणार आहे. मंगळवारपासून ज्या विशेष वातानुकुलित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत, त्या १५ गाड्यांच्या जोड्यांची माहिती रेल्वेने यापूर्वीच जाहीर केली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळं सर्व प्रवाशी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर ५० दिवसांनंतर आता या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सनं रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त देताना म्हटलं की, “सोमवारी संध्याकाळी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत केवळ ३ तासांत ९.९ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे. तसेच भुवनेश्वर-नवी दिल्ली या गाडीसाठीची तिकिटं ६.३० वाजताच पूर्ण विकली गेली. त्याचबरोबर इतर काही मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची तिकीट अद्याप उपलब्ध आहेत,” असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रवाशांना ऑनलाइन किंवा मोबाईल अपच्या माध्यमातून आठवडाभर आधी तिकीट बुक करता येणार आहे. तसेच रद्द तिकीटाची बुकिंग होणार नाही. वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांचे छायाचित्र पोस्ट करताना आयसीसीने झाली ‘ही’ चूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरूवात जरी वेस्ट इंडीजने विश्वचषक जिंकून झाली असली तरी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या एकूण ११ विश्वचषकांपैकी ५ जिंकून या संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला, त्यानंतर १९९९ मध्ये स्टीव्ह वॉ, २००३ आणि २००७ मध्ये रिकी पॉन्टिंग, तर २०१५ मध्ये मायकेल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विश्वविजेता बनला.

आयसीसीने अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या या सर्व कर्णधारांचे एक छायाचित्र त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले, परंतु आयसीसीकडून हे छायाचित्र पोस्ट करण्यात चूक झाली. खरं तर आयसीसीने हे चित्र पोस्ट करत ४ वर्ल्डकप लिहिले, मात्र प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाने एकूण ५ वर्ल्ड कप जिंकलेले आहेत.

ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक जिंकणारे कर्णधार निश्चितच चार होते, पण त्यांच्याकडे पाच ट्रॉफी आहेत कारण ऑस्ट्रेलियाने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात दोनदा विश्वचषक जिंकला आहे.

 

उल्लेखनीय म्हणजे,२०१९ चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्वात खेळला. या विश्वचषकात उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर त्यांच्या संघाला स्पर्धेतून बाहेर काढावे लागले.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना यजमानांसमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने ३२.१ षटकांत ८ गडी राखून मिळवले. यानंतर इंग्लंडने थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आणि प्रथमच वर्ल्ड कप जिंकला.

ICC World Cup 2015: Team Australia - BookMyShow

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेट बोर्डला खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्याच वेळी यावर्षी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा होता, जर या साथीमुळे हा दौरा होऊ शकला नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ५० दशलक्ष डॉलरचे कर्ज घ्यावे लागू शकते.

द सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सर्व भागधारकांना कॉमनवेल्थ बँकेबरोबर कर्ज करार झाल्याची माहिती मिळाली आहे. सीएच्या संचालक समितीने मागील महिन्यात आपल्या ८० टक्के कर्मचार्‍यांना कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्जाला सहजपणे मान्यता मिळाल्यानंतर यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

Australian Captains with World cups. : Cricket

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जालन्यात आणखी एक जवानाचा किरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १४ वर

जालना प्रतिनिधी | जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एक जवानाचा अहवाल आज मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदावर पोहचली आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक,दोन रुग्ण वगळले तर बहुतांशी रुग्ण हे बाहेर जिल्हे अथवा राज्यांतून प्रवास करून जालन्यात परतलेल्या व्यक्तींपैकी आहेत.

जालना जिल्ह्यात कोरोना ला पूर्णपणे रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यशस्वी झाले असले तरी बाहेरून येणारी मंडळी खुशकीच्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करत असून त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत भर पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. पारध,कानडगाव,सातोना येथे परतलेल्या प्रवाशी हे त्यापैकीच असून बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांना वेळीच अटकाव करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown । मराठी- अमराठी, महाराष्ट्रीयन- परप्रांतीय वाद-विवाद आणि भूमिका…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अख्या जगाला कोरोनाच्या विळख्याने अगदी हैराण करून सोडले आहे, सर्व जगाला आणि मानवाला या कोरोनाने अंतर्मुख करायला लावलंय एवढं मात्र नक्की, त्यातून भारतासारखा विकसनशील देश सुटणार तरी कसा..!
काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्स वर महाराष्ट्र द्वेष , गुजरात प्रेम , बिहार-उत्तरप्रदेश प्रेम , परप्रांतीय , मराठी अशा विविध विषयांवर अनेक पोस्ट ह्या फिरत आहेत, त्यातूनचं हा लेख लिहिण्याचा प्रपंच..!

खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांतांची पुनर्रचना करताना भाषा , प्रशासकीय सोय , संस्कृती या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आणि राजकीय घटक म्हणून राज्यांना काही भौतिक रेषा आखण्यात आल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टी ठेवून भारतीय संविधानातचं कलम १९ (५)(६) नुसार देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतात  कुठेही राहण्याचा , स्थायिक होण्याचा आणि व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार दिला.

महाराष्ट्र हे भारतातल्या इतर राज्याच्या तुलनेत मानाने प्रगतशील राज्य असल्याने आणि मुंबई ही इंग्रजांच्या काळापासूनचं एक वैभवशाली शहर असल्याने साहजिकच उत्तरप्रदेश , बिहार अशा विकसनशील राज्यातील बेरोजगार तरुण मजूर म्हणून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात मुंबईकडे येऊ लागले. बरं इथे आल्यानंतर ते खूप आरामदायी आयुष्य जगत आहेत असंही नाही , मिळेल ते काम करणं , इथे झोपडपट्टीत राहून निम्नस्तरीय आयुष्य जगून ते आपल्या पोटाची खळगी भरताना आपण पाहतो. ह्या ‘सो कॉल्ड’ परप्रांतीय मजुरांना नावं ठेवताना किंवा हाकलून द्यायच्या गप्पा करताना यातील किती कामे आपले मराठी तरुण करू शकतील…? ते ही तितक्या कमी मोबदल्यात , हा ही विचार नावं ठेवताना नक्कीचं करायला हवा.

मराठी मालक सुध्दा जास्तीत जास्त यूपी-बिहारी लोकांनाचं कामावर का ठेवतात…? हा साधा विचार आपल्याकडून होत नाही. अहो , आपल्यातले बहुसंख्य तरुण तर आपण राज घराण्यात जन्म घेतलाय आणि हे असलं खालच्या दर्जाचं काम मी कसं आणि का करू , याचं अविर्भावात जीवन जगत असतात.

बरं परप्रांतात व्यवसायानिमित्त , शिक्षणासाठी जाणारे मराठी तरुण पण काही कमी नाहीत. माझे कित्येक मित्र आज बंगलोरच्या आयटी सेक्टर कंपनीत, तर कित्येक जण UPSC च्या क्लासेस साठी  व अभ्यासासाठी दिल्लीत राहत आहेत, तर काही इतर व्यावसायिक कामाच्या निमित्ताने कर्नाटक , मध्यप्रदेश , तेलंगणा राज्यात स्थायिक झालेले आहेत..ते ही तिथे परप्रांतीय आहेतचं की..!

आपल्यातला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यातल्या राज्यात का होईना स्थलांतरित आहेच की. मी स्वतः श्रीरामपूरचा असून शिक्षणासाठी पुण्यात आणि नोकरी निमित्ताने आज मुंबईत राहतो.
‘वसूधैव कुटुंबकम्’ असा संदेश जगाला देणारे आपण, भारतातल्याचं अन्य राज्यातल्या बांधवांना हाकलून द्यायच्या गप्पा मारताना सोयीस्कर रित्या हे सगळं विसरून जातो. असंच चालू राहीलं तर उद्या मुंबई , पुण्यातल्या स्थानिक लोकांनी आपल्यासारखे लोकं हे पर जिल्ह्यातील , पर तालुक्यातील आहेत म्हणून द्वेष केल्यास राग मानून घेऊ नका..पुढे जाऊन हा अहमदनगर चा , ती उस्मानाबाद ची असा विचार आपण करणार आहोत काय..??


सत्य परिस्थिती वर आधारित ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये दाखवल्याप्रमाणे “तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणारच ना” तसंच “तुम्ही आमच्या नोकऱ्या खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणारचं ना” अशी वेळ येऊ नये..

काही परप्रांतीय व्यक्ती ( म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचे फक्त) समाज विघातक कृत्ये करतात हे मान्य. पण महाराष्ट्रात असे मराठी व्यक्ती नाहीतचं असं कोणी म्हणू शकतं का. आपल्या आजू बाजूचे सगळे मराठी लोकं खूपचं चांगले आहेत काय…त्यांच्यात काहीचं वादविवाद नाहीत काय…आपल्या राज्यात गुन्हेगारी नाही का…?? साध्या ग्रामपंचायत निवडणुकीत भावकी मध्ये काठ्या , तलवारी , कोयत्याने मारामाऱ्या होताना मी पाहिलंय..

यूपी , बिहार मधून आलेले मजूर आपल्याला नकोत पण आपण मात्र दिल्लीत , चेन्नईत , हैद्राबाद , बंगलोरमध्ये नोकरी – व्यवसाय निमित्ताने स्थायिक झालेलं आपल्याला चालतं.. अमेरिकेच्या नासामध्ये (NASA) जवळपास २९% भारतीय आहेत , हे आम्ही मोठ्या अभिमानाने  सांगणार , हे कोणते विचार..

महाराष्ट्राच्या विकासात रतनजी टाटा , अंबानी बंधू , अजीज प्रेमजी सारखे व्यवसायिक आणि अक्षय कुमार , अमिताभ बच्चन यांसारख्या परराज्यातील सिनेतारक यांचं काहीच योगदान नाही काय. संकटाच्या काळात या व्यक्तींनी भरभरून दान केल्याचं आपण नेहमीचं पाहत नाही काय..??

देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्ती आज गुजरात ची आहे , या आधी पंतप्रधान पदावरील व्यक्ती आसाम मधून राज्यसभेवर निवडून आलेली होती आणि सर्वांत जास्त वेळा तर या पदावरील व्यक्ती उत्तरप्रदेश राज्यातीलचं होती आणि प्रत्येक वेळेस ती कोणत्या तरी एकाचं राज्यातील असू शकते , म्हणून इतर राज्यातील व्यक्तींनी त्यांना गुजराती व्यक्ती पंतप्रधान , पंजाबी व्यक्ती पंतप्रधान असंचं म्हणायचं का…?? व्यक्ती द्वेष करता करता आपण किती हीन पातळीवर जाणार आहोत , याचाही विचार व्हायला हवा.

नाशिक जिल्ह्यातील धरणांतील सोडलेलं पाणी अहमदनगर जिल्ह्याला हवं असतं त्यासाठी आमच्याकडे अहमदनगर जिल्ह्यात उपोषणे केली जातात पण तेच पाणी पुढे औरंगाबाद जिल्ह्यातील माणसांची , मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातुन सोडायची वेळ आली की, आम्ही नको तितका विरोध करणार , किती हा विरोधाभास…!
         
काही दिवसांनी लॉकडाउन ही संपेल आणि सगळं काही पहिल्या सारखं सुरळीत चालू होईल. आपल्यातले कित्येक जण पुन्हा आपआपल्या कामावर चेन्नई , हैद्राबाद , बंगलोर दिल्लीला जातील. तसेच परराज्यातील मजूर देखील पुन्हा इथे कामावर येतील, तेव्हा त्यांना प्रेमाने सामावून घ्यावं. प्रतिज्ञेत लिहिल्या प्रमाणे “सारे भारतीय माझे बांधव आहेत” हे कृतीतून दाखवून द्यावं, एवढंचं मला वाटतं , बस्स..!

डॉ.कमलेश जऱ्हाड ( लेखक हे मंत्रालय मुंबई येथे स. कक्ष अधिकारी आहेत).

आज राज्यात सापडले १ हजार २३० नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २३ हजार ४०१ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४७८६ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४ नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३, ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ टक्के ) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १४,५२१ (५२८)
ठाणे: १२५ (२)
ठाणे मनपा: ९२७ (१०)
नवी मुंबई मनपा: ८९८ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३६६ (३)
उल्हासनगर मनपा: ३०
भिवंडी निजामपूर मनपा: ३२ (२)
मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)
पालघर: ३७ (२)
वसई विरार मनपा: २४९ (१०)
रायगड: १२३ (१)
पनवेल मनपा: १३९ (२)
ठाणे मंडळ एकूण: १७,६६१ (५६६)

नाशिक: ६०
नाशिक मनपा: ४०
मालेगाव मनपा: ५९५ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ४५ (३)
जळगाव: १४५(१२)
जळगाव मनपा: ३५ (७)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १०१५ (६४)

पुणे: १६६ (५)
पुणे मनपा: २४७८ (१४९)
पिंपरी चिंचवड मनपा: १४७ (४)
सोलापूर:९
सोलापूर मनपा: २८७ (१६)
सातारा: १२१ (२)
पुणे मंडळ एकूण: ३२०६ (१७६)

कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ४२ (२)
कोल्हापूर मंडळ एकूण: १०४ (४)

औरंगाबाद:९३
औरंगाबाद मनपा: ४९१ (१४)
जालना: १४
हिंगोली: ६०
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ६६० (१५)

लातूर: २६ (१)
लातूर मनपा: ५
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ४
नांदेड मनपा: ४१ (४)
लातूर मंडळ एकूण: ८० (५)

अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १४४ (१०)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९७
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३६८ (२५)

नागपूर: २
नागपूर मनपा: २५७ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २६६ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २३ हजार ४०१ (८६८)

मास्क का घातलेला नाही विचारणाऱ्या पोलिसाला नगरसेवकाची धक्काबुक्की

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आता २३ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन वगळता इतर भागांत लॉकडाऊन मध्ये थोड्याबहुत प्रमाणात शिथिलता आणण्यात आली असली तरी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे मास्क का घातलेला नाही असं विचारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला नागरसेवकाकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, म्हसवड येथील नगरसेवक अखिल काझी हे मास्क न खालता बाहेर रस्त्यावरून फिरत होते. पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सदर बाब लक्षात आल्यावर त्यांनी नगरसेवक काझी यांस मास्क का घातलेला नाही असे विचारात मास्क लावण्यास सांगितले. मात्र यावर काझी यांनी पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता या नगरसेविका विरोधात कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

कोरोनामुळे सतार जिल्ह्यात भीतीचे वातावरण असताना एका बाजूला प्रशासन योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडूनच अशा प्रकारे बेजबाबदारपणाची वागणूक होत असेल तर हे चिंताजनक आहे. तोंडाला मास्क न वापरणाऱ्यावरन नगरसेवकाला कारवाई म्हणून 500 रुपयांच्या दंड ठोठावण्यात आला आहे. मास्क बांधने बंधनकारक असून हाच नियम मोडून म्हसवड पालिकेचे नगरसेवक काझी आणि पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, दोघांकडून एकमेकांना धक्काबुक्की देखील करण्यात आल्याचे व्हायरल व्हिडिओमधून दिसत आहे.

अन.. सलून वाल्यांनी केले पी पी ई किट धारण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सध्या देश्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून चालकाने केला आहे. डॉक्टराचे पी पी ई किट घालून सलून मध्ये केस कटिंग सुरू केले आहे. या सलून चालकाची चांगलीच चर्चा सांगलीत रंगली आहे.

सांगलीच्या सावरकर कॉलनीमध्ये किरण जाधव यांचे रविज सलून हेअर कटिंग दुकान आहे. ते गेले सहा वर्षे पासून या धंद्यात आहेत. मात्र कोरोना मुळे गेली काही दिवस त्यांचे दुकान बंद होते. प्रशासनाने काही अटी घालत सांगली मध्ये अनेक व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली आणि किरण जाधव यांनी गेले दोन दिवस झाले दुकान सुरू केले आहे. किरण यांच्या बरोबर दुकानात ऋषिकेश या दोघांनी हटके प्रयोग केला आहे.

दरम्यान, आपल्याला ही कोरोनाचा लागण होऊ नये आणि ग्राहक ही सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी डॉक्टराचे पी पी ई किट घालून सलून मध्ये केस कटिंग सुरू केले आहे..येणाऱ्या ग्राहकाला आत प्रवेश देताना सॅनिटायजर ने हाथ धून प्रवेश केला जातो.. आणि मगच केस कटिंग सुरू होते.. त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कोतुक होत आहे..

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2954631007955263

मुंबई आणि पुणेकरांकडून पुन्हा सांगलीचा घात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या दुधेभावी येथील एका व्यक्तिमुळे कुपवाड वाघमोडेनगर येथील एका तरुणीला कोरोनाची लागण झाली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतून बेकायदेशीर प्रवास करून एका व्यक्तिने सांगली गाठली. त्याला देखील कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांमुळे सांगलीचा पुन्हा घात झाला आहे.

सांगलीत मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांवर प्रशाासन व स्थानिक नागरिकांनी डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय जिल्हा बंदी देखील कडक झाली पाहिजे. कोरोनाचा फैलाव राज्यात वाढत चालला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई व पुणे या भागातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. जिल्हा बंदी असल्याने अनेकजण बेकायदेशीर प्रवास करत आहेत. विनापरवाना प्रवास करून आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे सांगलीला धोका निर्माण झाला आहे.

सिगारेट न दिल्याच्या कारणावरुन परप्रांतियांचा राडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सिद्धेवाडी येथील विजयसिंहराव नानगुरेयांना दिलीप बिल्डकॉमच्या कामगार कन्हैया सिंग आणि रुपेंद्र तोमर यांसह सात ते आठजणांनी सिगारेट देत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानाची तोडफोड करून चारचाकी गाडीही पेटवली व दुचाकीचे ही नुकसान केले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या राड्यात अंदाजे एकूण १ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून दुकानदार विजयसिंहराव नानगुरे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात कन्हैया कुमार व इतर सातजणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मिरज ग्रामीण पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी कन्हैया सिंग आणि रुपेंद्र तोमर यांना अटक केली आहे.

शुक्रवारी रात्री दिलीप बिल्डकॉम कंपनीमध्ये काम करणारा कामगार कन्हैया व त्याचा एक साथीदार असे बोलोरो गाडी घेऊन आले. त्यावेळी कन्हैयालाल सिंग याने दारूच्या नशेत नानगुरे यांना सिगारेट मागितले. यावेळी नानगुरे यांनी संचारबंदी असल्यामुळे दुकानात माल कमी आहे. सिगारेट विकत नसल्याचे अनेकदा सांगितले. मात्र नशेत असलेल्या कन्हैयालाल सिंह हा नानगुरे यांना शिवीगाळ करून अंगावर धावून गेला. त्याला विरोध करताच सिंग आणि त्याच्यासोबतच्या अन्य व्यक्तीने नानगुरे यांना मारहाण केली. अंड्याचे ट्रे, तसेच किराणा मालाचे साहित्य, कोल्डिंक्सच्या बाटल्या, फोडून नासधूस केली. तसेच जवळच असलेल्या रूममधील बेडवरील गादीला व स्वीप्ट गाडी आग लावली. तसेच नानगुरे यांना मारहाण केली.

या प्रकाराची नानगुरे यांनी सिद्धेवाडीत माहिती दिली. त्यानंतर सिद्धेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दुकानाचे मालक नानगुरे यांनी बाका प्रसंग पाहून तेथून काढता पाय घेतल्याने ते बचावले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

गुजरातमधून आलेली सांगलीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेली एक 30 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रविवारी वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेच्या पतीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 94 वर्षीय कोरोनाबधित आजीने 14 दिवसांच्या औषधोपचारानंतर कोरोनाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

कासेगाव, कामेरीतील 25 जणांना रविवारी घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील सद्यस्थितीत कोरुना रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली. शासनाने परराज्यात अथवा बाहेरील जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिली आहे सांगली जिल्ह्यात परराज्यातूनही अनेक नागरिक येत आहेत त्यांची तपासणी करून होम क्वॉरंटाईन केले जात आहे. खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे गुजरात मधून पती-पत्नी आली होती. त्या दोघांना गावामध्ये होम क्वारंटाईन केले होते.

त्यानंतर ते दोघे परराज्यातून आले असल्याने त्यांची विटा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. तीस वर्षीय महिलांमध्ये कोरोना बाबतची काही लक्षणे ग्रामीण रुग्णालयात आढळली. त्यामुळे महिला आणि तिच्या पतीला मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले. तेथे कोरोना तपासणीसाठी त्या दोघांचे स्वब घेण्यात आले होते. कोरोना तपासणीचा अहवाल संध्याकाळी आला असून ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेचा पतीची चाचणी निगेटिव्ह आली आहे. साळशिंगे बाहेरून आलेल्या महिलेला कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव केले आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले. कामेरी आणि कासेगावमधील काही व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कामेरीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील 94 वर्षीय आजीचा अहवाल पॉझिटिव्ह आली होती. त्या आजीला मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 14 दिवसांच्या औषधोपचारानंतर आजीची कोरोनाची पहिली चाचणी घेण्यात आली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने आजीने कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले. कासेगाव आणि कामेरीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पंचवीस जणांचा अहवाल ही निगेटिव्ह आला होता, त्यांनाही रविवारी घरी सोडण्यात आले.