बीड प्रतिनिधी । भाजप हा माझ्या बापाचा पक्ष असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय धुमश्चक्रीला जिवंतपणा आणून देण्याचं काम गोपीनाथगडावर आज केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे, महादेव जानकर यांनी आपली खदखद बाहेर काढली.
सत्तास्थापनेवच्या आधी टीव्हीवर केवळ संजय राऊत दिसायचे, ते जे बोलले त्यांनी ते करुन दाखवल्याचं पंकजा मुंडेंनी भाषणाच्या सुरुवातीला स्पष्ट केलं. मागचे दोन महिने मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त राजकारण पाहिलं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एक एक आमदार निवडून आणण्यासाठी मी झटत राहिले, असं असताना फडणवीसांना मी प्रतिस्पर्धी वाटलेच कशी असा सवाल पंकजा यांनी यावेळी उपास्थित केला. गोपीनाथ मुंडेंच्या कामावर प्रकाश टाकत असतानाच पक्ष वाढीसाठी आपण सदैव काम करत असताना आपण पक्ष सोडणार असल्याची अफवा कुणी पसरवली हे शोधून काढावं असं पंकजा पुढे म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडे यांची समाधी अजूनही कमळावरच असून त्या कमळावर तरी बुलडोझर फिरवू नका असं आवाहन करतानाच माझा स्वभावच बंडखोर असून बंडखोर लोकांनीच इतिहास घडवल्याचं पंकजा यांनी सांगितलं.
मी पक्ष सोडणार नाही असं सांगत असतानाच पक्षाला मला सोडायचं असेल तर खुशाल सोडावं असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. मी अल्पसंख्याक आहे आणि त्यामुळेच आता सर्वांची झाली आहे असं सांगत २६ जानेवारीपासून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर संघर्षयात्रा काढणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.