हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टीका झाली. कोश्यारीना परत दिल्लीला बोलवून घ्या अशी मागणी विरोधकांनी केंद्राकडे केली आहे. त्यातच आता भगतसिंह कोश्यारी याना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने ऍड नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यपाल वादग्रस्त विधान करुन समाजातील शांतता, एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करावी अशी मागणी करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम 19 अंतर्गत बंधने काय ? असा सवालही याचिका कर्त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.