अँटिलिया स्फोटक प्रकरण : पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यांपूर्वी उदयोजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या प्रकरणी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर आता एनआयएच्या अटकेत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांनादेखील मुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून पोलिस निरीक्षक सुनील माने यांना पोलिस दलातून बडतर्फ केले आहे.

ज्यावेळी ॲंटिलिया स्फोटक प्रकरण उघडकीस आले त्यावेळी सुनिल माने हे गुन्हे शाखा युनिट ८ मध्ये कार्यरत होते. याप्रकरणी सुनील माने यांनी वाझेंना मदत केल्याचे समोर येताच त्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती.यानंतर काही दिवसांनी त्यांचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर एनआयएकडून त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकणातील सर्व चारही पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील कांदिवली क्राइम ब्रँचमध्ये सुनील माने हे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात माने यांची दहशतवाद पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी करण्यात आली होती. सुनील माने यांना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक झाली होती. तसेच त्यांना मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाची पूर्वकल्पना होती असा दावा एनआयएकडून करण्यात आला होता.