विनामास्कसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा दंड वसूल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. दररोज ८०० च्या घरात रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शनिवारी दिवसभरात ८० जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून तब्बल ९७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यात ओमायक्रोन व्हेरिएन्ट मुळे कोरोनाची तिसरी लाट सध्या पसरत आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. जिल्ह्यात दररोज ८०० हुन अधिक रुग्ण बाधित होत आहेत. वातावरणात झालेल्या बदलांमुळे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी नियमांचे पालन करा, सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करा असे वारंवार सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला काही नागरिकांकडून हरताळ फासल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी थेट रस्त्यावर उतरत विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.

पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला जिल्हयात गर्दीच्या ठिकाणी, मॉल, बाजार व इतर गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर तसेच विनाकारण फिरणा-या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. यावेळी नियमबाह्य तसेच नियम मोडणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात आली. शनिवार दि. २२ रोजी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या ५२४ जणांवर गुन्हा दाखल करत २८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत ६८ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले. दिवसभरात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत ९७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाई करू असा इशारा यावेळी अधीक्षक गेडाम यांनी दिला.