हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. कोर्टाचा निकाल कधीही समोर येऊ शकतो. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते. मात्र मध्यावधी निवडणुका घेण्याऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. ही शक्यता अधिक आहे असं त्यांनी म्हंटल. तसेच प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून भाजपकडून धार्मिक भावना भडकवण्याचे काम सुरू आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या या दाव्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनीही हेच संगितलं. जयंत पाटील बरोबर बोलतायत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कायदयाने सर्वकाही होणार असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार कोसळेल असं संजय राऊत यांनी म्हंटल. परंतु कायद्याने सर्वकाही व्हायला हवं असेही त्यानी म्हंटल.