सत्ता गेली चुलीत आता घरात स्वस्थ बसू देणार नाही : चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातील कोथरूड येथील एका कोविड सेंटरला स्थानिक आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. सत्ताधारी पक्षातील काही नेते करोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्या आंदोलन करणार आहेत, यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”सत्ता गेली चुलीत आता सर्व सामान्य माणूस लोकप्रतिनिधींना घरात स्वस्थ बसू देणार नाही. जर उद्या लोक मंत्र्याच्या, आमदाराच्या किंवा खासदाराच्या घरात घुसले तर आश्चर्य वाटायला नको. इतके लोक प्रक्षुब्ध झाले आहेत. लोक वणवण फिरत आहे. त्यावर उध्दव ठाकरे का उपाय योजना करीत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे काल पोलीस स्टेशनमध्ये गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे . त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कसल्या केसेस दाखल करत आहात. गेल्या १८ महिन्यात कित्येक केसेस दाखल करणार अशी भाषा करणारे अनिल देशमुख गेले. तुम्ही आलात तेव्हा सौम्य वाटलात. पण तुम्हाला देखील काही पर्याय नसून मागून इंजेक्शन दिले की पळावे लागते. पण कितीही केसेस दाखल करा, आम्ही घाबरत नाही.”

तर, ”भाजपा रेमडेसिवीर आणून कुत्र्यांना, मांजरांना देणार आहे का? माणसांनाच देणार आहे ना?” असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ते पुढे म्हणाले की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्याशी दोन वेळा फोनवर बोले असून त्यानुसार राज्याला सर्वोतोपरी मदत केली जात आहे. मात्र तरी देखील मदत केली जात नाही. असं खोट बोलण्याचे काम सध्या केले जात आहे. १६ कंपन्यांना आदेश दिले खोट बोलायचं, ऑक्सिजन, लस दिली जात नाही खोट बोलायचं, प्रत्येक गोष्टीत खोट बोलायचं, हे चाललय काय? लोकांना काय वेड्यात काढत आहात का? तुमच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. रुग्ण वाढत आहेत हे मान्य असून आपण मिळून काम करूया मात्र सध्या अशा प्रकारच राजकारण होता कामा नये अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.

”राज्य सरकार काही करताना दिसत नाही. पण सध्या काही झाले तरी केंद्र सरकारवर आरोप करताना दिसत आहे. ही चुकीची बाब आहे. राज्यातील जनतेला बेड, रेमडेसिवीर मिळावे यासाठी जर देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत असतील. याकरिता अनेक लोकांशी ते चर्चा करीत असतील तर उद्धव ठाकरे का करत नाहीत? अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.