हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष बांधण्यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. बीड, कोल्हापूरनंतर आता शरद पवार भंडाऱ्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे, नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा होत असताना खुद्द पटेल यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना या सभेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पटेल यांचा हे सांगण्यामागचा नेमका हेतू काय होता? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
राष्ट्रवादी झालेल्या फुटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी देखील अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पोहोचले. यावेळी त्यांच्यासाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच बोलताना त्यांनी, शरद पवार यांना टोला लगावला. तसेच, “जर भंडाऱ्यात शरद पवारांची सभा झाली तर त्या सभेला सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून जावे” असे देखील सांगितले.
आता प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलेल्या या आदेशानंतर त्यामागील हेतू काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शरद पवार यांचे भंडाऱ्यातील सभा देखील इतर सभांप्रमाणेच मोठी होईल असे सांगितले जात आहे. अद्याप, शरद पवारांच्या भंडाऱ्यातील सभेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या सभेसाठी अंतर्गत सर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. शरद पवार यांची भंडाऱ्यात सभा झाल्यानंतर ते प्रफुल पटेल यांच्यावर निशाणा साधतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. आता हे दोन्ही गट आगामी निवडणुकांसाठी मैदानात उतरले आहेत. अजित पवार गटाकडून राज्यातील विविध भागांमध्ये दौरे सुरू करण्यात आले आहेत. तर खुद्द शरद पवार पक्ष बांधणीसाठी सभा घेताना दिसत आहेत. बीडनंतर शरद पवार यांची कोल्हापूर आणि भंडाऱ्यात सभा होणार आहे. या सभेसाठी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील इतर प्रमुख नेते उपस्थित असतील.