हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारने लागू केलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षण वैध असून घटनाविरोधी नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता देशात आर्थिक घटकांना आरक्षण देता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “या निर्णयाच्या माध्यमातून नव्या रितीने मनुस्मृतीला सुरुवात झाली आहे. हा निर्णय म्हणजे कलम 14 च्या विरोधातील आहे,” असे आंबेडकरांनी म्हंटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दुर्बल घटकांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात आले. मात्र, आर्थिक आधारावर आरक्षण देताना त्याची जात हा आधार नाही, तर आर्थिक स्थिती पाहिली जाणार आहे. न्यायालयाने आज दिलेला आजचा निर्णय म्हणजे कलम 14 च्या विरोधातील आहे.
या निकालानंतर आता जे काही आरक्षण बाकी राहिले आहे. त्या आरक्षणात सुद्धा आर्थिक निकष येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एससी, एसटी यांनी जो काही बदल करायचा, तो सुचवला पाहिजे. तसेच, त्यांनी सावधान राहावे कारण सर्वोच्च न्यायालय त्यांच्या बाजूने नाही. सर्वोच्च न्यायालयातील पुर्ण विचारसारणी बदलली असून सामाजिक पेक्षा आर्थिक विषमतेला ते अधिक महत्व देत आहेत एकंदरीत आजचा निकाल हा ‘भ्रष्ट निकाल’ असल्याचे आंबेडकरांनी म्हंटले.