मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फुट पडण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण वंचित आघाडीचे नेते आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या हाताखाली मी काम करू शकत नाही असे लक्ष्मण माने यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वंचित बहुजन आघाडीत प्रकाश आंबेडकरांमुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील लोक आले आहेत. याच लोकांनी वंचित आघाडी व्यापून टाकली आहे. त्यामुळे आम्ही स्थापन केलेली वंचित आघाडी आमच्यासाठीच परकी झाली आहे. आम्ही स्व:ताचे पैसे खर्च करून वंचित आघाडीसाठी खपलो आहे. त्यामुळे आयत्या बिळावरच्या नागाबाचे वर्चस्व वाढू लागल्याने प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे. लक्ष्मण माने यांचा सर्व रोख हा भाजपमधून वंचित बहुजन आघाडीत आलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यावर होता. कारण त्यांच्या मागून वंचितमध्ये येवून पडळकरांना मोठे स्थान देण्यात आले आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आम्ही युती करायला हवी होती. कारण लोकसभा निवडणूक निकाल बघता १० जागा या भाजप सेने सारख्या प्रतिगामी पक्षाला मिळाल्या आहेत. त्या जागा त्यांना मिळाल्या नसत्या. त्यांना त्या जागी विजय मिळाला याचं मला दु:ख आहे. पडळकरांना दिलेल्या महासचिव पदाबद्दल देखील लक्ष्मण मानेंनी उघड नाराजी बोलून दाखवली आहे. आरएसएसची लोक आंबेडकरवाद्यांच्या कळपात कशाला पाहिजेत अशी टीका करून लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकर यांना राजीनामा मागितला आहे.