हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मलिकांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू केले आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. एसटी आंदोलनाकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. मात्र, दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ आहे,” असा आरोप दरेकर यांनी केला.
प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या महाविकास आघाडी सरकारचा कारभार पाहिला तर एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. आता तर गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी नव्हेत, असा जावई शोध महाविकास आघाडी करत आहे. या घटनेला मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याशी भाजपचा संबंध जोडला. मात्र, यात भाजपचा कोणताही संबंध नाही. ठाण्याचे आमदार सरनाईक यांनी परदेशात व्यवहार केला त्यामुळे ईडीने कारवाई केली. वनमंत्री संजय राठोड यांनी मुलीला आत्महत्या करायला भाग पाडले, असे दरेकर यांनी सांगितले.