हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आज मुंबई पोलिसांच्यावतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी करण्यात आलाय. तब्बल तीन तासाच्या चौकशीवरून दरेकरांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. माझ्या आजच्या चौकशीवेळी मला उलट सुलट प्रश्न विचारण्यात आले. मात्र, पोलिसांवर सरकारचा प्रचंड स्वरूपाचा दबाव असल्याचे दिसून आले, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला.
प्रवीण दरेकर यांची आज माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप आमदार नितेश राणे उपस्थित होते. यावेळी दरेकर म्हणाले की, मुंबई पोलिसांनी मला आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती.त्यानुसार मी आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो. त्यांनी चौकशीवेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे सुद्धा दिली.
नेमके काय आहे प्रकरण ?
१९९७ पासून मजूर असलेल्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.