व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधीत व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. ईडी ने नवाब मलिक यांची संपत्ती जप्त केली आहे. मलिक यांच्या जवळपास 8 मालमत्तांवर ईडी ने टाच आणली आहे.

नवाब मलिक यांचे कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड ईडीने जप्त केले आहे. कुर्ला पश्चिम येथील व्यावसायिक जमीनही जप्त करण्यात आली आहे, येवडच नव्हे तर कुर्ल्यातील 3 फ्लॅट, 2 राहत्या घरांवर जप्ती आणली आहे. नवाब मलिक यांची उस्मानाबाद येथील जवळपास 147 एकर जमीनीचाही या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत समावेश आहे.

यापूर्वी ईडीचे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट, 2002 च्या कलमांखाली मलिक यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासासाठी 24 मार्च रोजी त्यांच्या संपत्तीची माहिती मागितली होती. ईडीने सांताक्रूझ पश्चिम येथील फ्लॅट क्रमांक 6, गुलामनबी मनील आणि फ्लॅट क्रमांक 501, वांद्रे वास्तू आणि वांद्रे पश्चिम संदर्भात तपशील मागवला होता. ईडीने कुर्ला पश्चिम येथील नूर मंझिल येथील फ्लॅट क्रमांक बी-03, सी-2, सी-12 आणि जी-8 ची माहितीही मागितली होती, जी कथितपणे मलिक यांची पत्नी मेहजबीन यांच्या नावावर आहे.

मनी लॉंद्रीग प्रकरणी नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. मलिकांना कुख्यांत गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहीणीशी जमीन व्यवहार आदीबाबत ईडीने अटक केली होती.