मनपा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादेत

औरंगाबाद – आगामी औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज शुक्रवारी मुंबईत झाली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, बाळा नांदगावकर यांनी दिली.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईतील बैठकीनंतर पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे औरंगाबाद येथे येतील. अर्थात कोव्हिड संबंधी सर्व नियमांचे पालन करत, जेवढ्या कार्यकर्त्यांची परवानगी मिळेल, तेवढ्याच संख्येने कार्यकर्ते व नेते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली. सकाळी दहा वाजता औरंगाबादमधील प्रमुख नेते, माजी नगरसेवक, सध्याचे नगरसेवक यांच्याशी पालिका निवडणुकांसदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होईल. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील.

You might also like