हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लिहिले होते. त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतल्यांनंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचे आभार मानले आहेत.
काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार असं राज ठाकरेंनी म्हंटल.
https://www.facebook.com/RajThackeray/posts/657829689037271
दरम्यान, दुसरीकडे मुरजी पटेल यांच्या समर्थकांनी मात्र राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. राज ठाकरेंमुळेच भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. भाजप जर दुसऱ्या पक्षाचे ऐकणार असेल तर आम्ही त्यांचे समर्थन करणार नाही. राज ठाकरेंच्या पत्रानंतर निर्णय घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. राज ठाकरेंच्या दबावामुळेच मुरजी पटेल यांचा अर्ज भाजपने मागे घेतला असा थेट आरोप करत पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.