वसंतदादांच्या बालेकिल्ल्यात राजारामबापूंचा नातू निवडणूक रिंगणात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी  | आघाडी धर्मामुळे सांगली लोकसभा व विधानसभेची जागा मित्रपक्षाला जाते. या ठिकाणी सतत राष्ट्रवादी मित्रपक्षाला मदत करते. मात्र येणार्‍या निवडणुकीत सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादीला घ्यावी व प्रतिक जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केली. तर महापालिकेची निवडणूक देखील स्वबळावर लढवण्याचा नारा देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगली विधानसभा मतदारसंघाचा परिवार संवाद मेळावा डेक्कन हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, आमदार अरूण लाड, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षमा सलगर, प्रतिक पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवकचे राहुल पवार, सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अध्यक्ष पद्माकर जगदाळे, युवकचे सचिन जगदाळे, शेखर माने आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रस्ताविक करताना संजय बजाज म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची सांगली विधानसभा मतदारसंघात ताकद वाढली आहे. मात्र प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सांगलीची जागा ही मित्रपक्षाला जाते. मित्रपक्षाचा प्रचार कार्यकर्त्यांना करावा लागतो. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते काम करतात. मात्र उमेदवार व चिन्ह पक्षाचे नसल्याने कार्यकर्त्यांची प्रचंड अडचण निर्माण होते. त्यामुळे सांगली व मिरज विधानसभेची जागा राष्ट्रवादीने घ्यावी व सांगलीतून प्रतिक जयंतराव पाटील यांना उमेदवारी द्यावी, तशी कार्यकर्त्यांची मागणी देखील असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाय महापालिकेची निवडणूक देखील स्वबळावर लढवावी, म्हणजे राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले व उमेदवारी न मिळालेले लोक भाजपकडे जाणार नाही, असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विचार होणे आवश्यक आहे. मतांची चाचपणी करण्याची संधी मिळायला हवी. पक्षाने याचा जरूर विचार करावा. काही जण राज्य अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जातीयभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण कार्यकर्त्यांनी त्यांना ताकद दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment