हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राजकारण घडणाऱ्या घडामोडींवर चित्रपट, वेब सिरीजही निघत आहेत. आता राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळीही मराठी, हिंदी चित्रपटात करू लागले आहेत. राजकारणात आपल्या खास शैलींमुळे ओळख असलेले दोन दिग्गज असे राजकीय नेते चित्रपटात झळकणार आहेत. ते म्हणजे आरपीआय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी होय. हे दोघे ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपटात दिसणार आहेत.
राजकारणात आपल्या आक्रमक व प्रभावशाली शैलीमुळे केंद्रीयमंत्री रामदास आठवले आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे नेते राजू शेट्टी हे नेहमीच चर्चेत आले आहेत. आता या दोन्ही नेत्यांनी मराठी चित्रपटातून दमदार अशा भूमिका साकारल्या आहेत. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळे चित्रपट रिलीज झाला नाही. अखेर दोन वर्षांनी या चित्रपटाला मुहूर्त मिळाला असून 26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
दमदार राजकीय नेत्यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे वैशिष्ट्यही तितकेच वेगळे असे आहे. निर्माते बंटी सिंग यांनी राष्ट्रभक्तीवर आधारीत तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली करण्यात आलेली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केले असून आहे. यामध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारे कथानक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
मराठी चित्रपटाच्या माध्यमातून सध्या राजकारणातील ताजा असणारा आरक्षणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडण्यात आलेला आहे. या चित्रपटात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव असे मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. एकंदरीत या छत्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन दिग्गज अशा नेत्यांचा अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.