हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं होत, त्यासाठी ते आमच्या घरी येऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांना यासंदर्भात शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करा अशी मागणी करत होते, परंतु संजय राऊत यांनी त्यांना शिवसेनेतच राहण्याचा सल्ला दिला असा मोठा खुलासा संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. नुकतंच रामदास कदम यांनी संजय राऊतांवर टीका करत त्यांचं शिवसेनेत योगदान काय असा सवाल केला होता, त्यावर सुनील राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत वरील खुलासा केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रामदास कदम यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की, यापूर्वी जेव्हा जेव्हा ते आमच्या घरी आले तेव्हा तेव्हा ते म्हणायचे, मला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जायचं आहे, आपण शरद पवार साहेबांशी बोलून घ्या. आपण जर पवार साहेबांशी बोललात तर राष्ट्रवादीत माझं बस्तान योग्य प्रकारे बसेल अशी मागणी रामदास कदम यांनी वारंवार संजय राऊतांकडे गेली, मात्र शिवसेना सोडण्यात काही अर्थ नाही, शिवसेनेतच तुमचं भविष्य आहे असं संजय राऊतांनी रामदास कदमांना त्यावेळी सांगितल्याचा खुलासा सुनील राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले, रामदास कदम आज संजय राऊतांना निष्ठेच्या गोष्टी शिकवत आहेत. परंतु संजय राऊत तसेच कोणत्याही शिवसैनिकाला रामदास कदम यांनी निष्ठा शिकवण्याची गरज नाही. उलट निष्ठा म्हणजे काय असते हे संजय राऊत यांच्याकडूनच शिकावे, जे भाजपच्या समोर झुकले नाहीत, संजय राऊत साडेतीन महिने तुरुंगात गेले परंतु त्यांनी भाजपपुढे कधीही गुडघे टेकले नाहीत. त्यामुळे तुम्ही संजय राऊतांना निष्ठा शिकवा नका असं प्रत्युत्तर सुनील राऊत यांनी रामदास कदमांना दिले.