हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे खुले आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेब थोरात यांचे विधान हास्यास्पद असून काँग्रेसची मोडकळीस आलेली माडी पवारांनी कधीच सोडली अस म्हणत टोला लगावला आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आताही पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. पवारांनी टेकू काढून घेतला तर काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, अस म्हणत बाळासाहेब थोरातांची ऑफर हस्यास्पद आहे अशी टीका दानवे यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले होते-
काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेसचे विचार पुरोगामी विचार आहेत. आपण एका विचाराचे आहोत. पवारांनी टीका-टीप्पणी करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं. युपीए म्हणून एकत्र होतो आणि सहकारी म्हणूनही एकत्र होतो. युपीएचा कारभार चांगला होता, असे बाळासाहेब थोरात म्हणाले