मुंबई प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय रविकांत तुपकर भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात तुपकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जाते आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेले रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण चेहरा होते. त्याच प्रमाणे त्यांचा शेती प्रश्नाचा अभ्यास आणि संघटन कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पहिल्या फळीत स्थान मिळवले होते. मात्र मागील काही दिवसापासून रविकांत तुपकर राजू शेट्टी यांच्यावर नाराज असल्याचे चित्र बघायला मिळत होते. कारण लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी घेतलेले काही निर्णय तुपकर यांच्या जिव्हारी लागले होते. त्यांच्या नाराजीचा फायदा करून घेण्याचा भाजपने चांगलाच प्रयत्न केला असून त्यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले आहे.
रविकांत तुपकर हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी विदर्भातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी देखील केली होती. मात्र आघाडीकडून हा मतदारसंघ पदरात पडून घेण्याचा राजू शेट्टी यांनी प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी स्वतःचा आणि स्वतःच्या मतदारसंघाच्या शेजारचा मतदारसंघ मात्र स्वतःच्या खिशात घातला. मात्र त्या दोन्ही मतदारसंघात स्स्वभिमानीला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे रविकांत तुपकर अधिकच नाराज झाले आणि त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.