राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये; रोहित पवारांचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल पुणे येथील एका कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. त्यावेळी जोरदार गोंधळ झाला. या कार्यक्रमात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारल्याची घटना घडली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तक्रारही दाखल करण्यात आली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करीत “भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे म्हणत निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करीत पुण्यात घडलेल्या घटनेवरून मंत्री इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये अशी टीका करत या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.

गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे,” अशा शब्दांत पवार यांनी स्मृती इराणी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

यावेळी पवारांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारे आहे, असेही पवार यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment