…तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात असेल; शरद पवारांच्या अल्टिमेटमनंतर रोहित पवार आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील 10 वाहनांवर बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून काल हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आपली भूमिका मांडली. शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईना 48 तासांचा अल्टिमेटम दिला. पवारांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी शरद पवार फक्त बोलत नाहीत तर ते करून दाखवतात. तसे झाले तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकमध्ये असेल, असे सूचक विधान केले.

रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटक सरकारला योग्य पद्धतीने उत्तर दिले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती. केंद्र सरकारने मध्यस्थी करायला हवी होती. संवाद न करता जे घडतंय ते निषेधार्ह आहे. महाराष्ट्र सरकार ठाम भूमिका घेत नाही. कर्नाटकमध्ये आपल्या राज्यातील गाड्या पेटवण्यात आल्या. काचा फोडण्यात आल्या. हे आपल्या हिताचे नाही.

कर्नाटकमध्ये काही दिवसांनंतर निवडणूक आहे. सध्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जर महाराष्ट्राच्या अस्मितेला बोट लावत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. शरद पवार फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्य सरकारने योग्य भूमिका घ्यावी. अन्यथा शरद पवार जे बोलले आहेत, ते करतील. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात असेल,” असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.