हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल फेल गेलाय. तिन्ही सामन्यात शुन्यावर बाद झाल्याने सर्वच स्तरावरून सूर्यकुमार यादववर टीकेची झोड उठवली जात आहे. सूर्यकुमारच एकदिवसीय करिअर संपत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्माने मात्र सूर्यकुमारची पाठराखण केली आहे.
सूर्यकुमारच्या खराब प्रदर्शनाबाबत रोहितला विचारलं असता तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत तो फक्त ३ च चेंडू खेळू शकला हे दुर्दैवी आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव तीन सर्वोत्तम चेंडूंवर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात सूर्याने चुकीचा शॉट निवडल्याचे रोहित म्हणाला. सूर्याला आपण आधीच ओळखतो, तो फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करतो. त्यामुळेच त्याला नंतरसाठी राखून ठेवले होते जेणेकरून तो शेवटच्या 15-20 षटकांमध्ये मुक्तपणे खेळू शकेल. रोहित शर्मा म्हणाला की, हे कुणासोबतही होऊ शकते, पण सूर्याकडे गुणवत्ता आणि क्षमता आहे असं म्हणत रोहितने त्याची पाठराखण केली.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्दच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार सलग तीनवेळा पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला. पहिल्या २ सामन्यात सूर्यकुमार मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पायचित झाला तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ऍश्टन अगरने त्याचा त्रिफळा उडवला. सूर्यकुमारच्या खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघाला ही वनडे सिरीज २-१ ने गमवावी लागली. आगामी आयपीएल आणि विश्वचषक स्पर्धेपूर्वीच सूर्यकुमार यादवच्या या खराब फॉर्ममुळे भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.