हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश आता निश्चित झालाय. उद्याच खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. मी एकटाच नसून माझ्या संपर्कात भाजपचे 15-16 आमदार असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला. परंतु रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. खडसे एकटेच राष्ट्रवादीत जातील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत 15 आमदार जाणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. तसेच जर त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांनी रिपाइंत यायला हवं होतं, असंही रामदास आठवले म्हणाले.
आठवले अतिवृष्टीग्रस्त लोकांना भेटण्यासाठी बारामतीच्या दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांनी खडसेंच्या राजीनाम्याविषयी विचारले तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसेंसोबत 15-16 आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही, असं आठवले यांनी सांगितलं. खडसेंनी रिपाइंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांना रिपाइं हा चांगला पर्याय झाला असता. पण ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.
पूरग्रस्ताना केंद्रकडून मदत मिळणारच आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वात आधी राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्याने आधी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माहिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले होते. शुक्रवारी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’