हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावरून पडलकर व खोत यांनी ड्रोनच्या साहाय्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको म्हणून बहुजन समाजाच्या हस्ते उद्घाटन केले. आज पापी लोकांच्या हस्ते उद्घाटन झाले नाही यांचे समाधान वाटते, अशी टीका खोत यांनी केली.
सांगली येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या पुढाकारातून धनगर समाजबांधव व मेंढपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पणानंतर पडळकर व सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत म्हणाले की, आम्ही मेंढपाळ व धनगर बांधवांच्या हस्ते ड्रोनद्वारे पुषपवृष्टी करून लोकार्पण केले आहे. आम्ही लोकार्पणासाठी परवानगी मागितली होती. मात्र, आम्हाला परवानगी पण दिली नाही. आज खऱ्या अर्थाने समाधान एका गोष्टीचे वाटते कि पापी माणसांच्या हस्ते लोकार्पण झाले नाही त्याचे, अशी घणाघाती टीका यावेळी खोत यांनी केली.
आमदार गोपीचंद पडळकर बहुजन समाजाचा वाघ आहे. माझ्या धनगर समाजाला पुष्पवृष्टी करण्याचा मान मिळविला. स्मारकाचा लोकार्पण सोहळा मेंढपाळाच्या हस्ते व्हायला हवा अशी सर्वांची भावना होती. त्यानुसार आज आम्ही लोकार्पण केलेले आहे. असेही यावेळी खोत यांनी सांगितले.