संभाजी भिडे यांचा भुवळ आल्याने अपघात; गंभीर जखमी

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सायकलवरुन जात असताना भोवळ येऊन भिडे यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये भिडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

भिडे गुरुजी हे सांगलीतील गणपती मंदिर मध्ये त्यांच्या सायकलवरून दर्शनासाठी निघाले होते. यावेळी नक्षी काम करणाऱ्या ओतारी यांच्या दुकानासमोर ते आले असता त्यांना अचानक भोवळ आली आणि ते सायकलवरून खाली कोसळले. या अपघातामध्ये त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. (Sambhaji Bhide)

अपघाताची माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. भिडे गुरुजी यांना उपचारासाठी सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली मिरज रोड वरील भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. भिडे गुरुजींच्या अपघाताची माहिती मिळताच श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकाऱ्यांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.