सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या जागा सेनेला मिळाव्या म्हणून जिल्हा शिवसेना संघटन आग्रह धरत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी आमदार सेनेच्या संपर्कात असून त्यांचा ही लवकरच पक्ष प्रवेश होईल. जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी पूर्ण झाली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी पदाधिकारी कार्यकर्ते तयार असून जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत पार पडल्या असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात वाढलेली सेनेची ताकद पाहता सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ हा मतदारसंघ शिवसेनेला मिळायला हवा. तीनही मतदारसंघ सेनेकडे घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे. संपर्कप्रमुख परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच संपर्क नेते नितीन बानगुडे-पाटील यांच्याशी याबाबत लवकरच चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत सांगली घ्यावी, अशी सर्वच कार्यकर्त्यांची मागणी आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार सेनेच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी प्राथमिक चर्चा सुरू असून त्यांच्या पक्षात प्रवेशाचा निर्णय लवकरच घेतला जाईल.
२००९ च्या सेना-भाजप फार्मूलानुसार सांगली, मिरज, जत येथील मतदारसंघ भाजपकडे होते. उर्वरित पाच मतदारसंघ शिवसेनेकडे होते. सद्यस्थितीत शिवसेनेची ताकद वाढलेली असल्याने सांगली-मिरज या जागासाठी आमचा आग्रह आहे. तासगाव-कवठेमंकाळ मधील राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छायाताई खरमाटे, भाऊसाहेब कोळेकर यांनी तर जत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजीवकुमार सावंत यांनीही सेनेत प्रवेश केला आहे. सेनेची स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी आहे. मात्र पक्षप्रमुख उमेदवाराबाबत निर्णय घेतील. तो कार्यकर्ते मान्य करतील, असेही जिल्हाप्रमुख विभूते यांनी सांगितले.