हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीत उडी मारून जीवन संपवले होते. या आत्महत्येने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच तृप्ती देसाई यांनी पूजाच्या घरच्यांची उभ्या उभ्या भेट घेतली होती. वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचा मान राखून राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपसह काही विविध संघटनांनी केली आहे. आता, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी थेट संजय राठोड यांनाच खुले पत्र लिहिलं आहे व राजीनाम्याची मागणी केली आहे.
तृप्ती देसाईंचं मंत्री संजय राठोड यांना खुले पत्र
प्रति,
संजय राठोड,
वन मंत्री ,महाराष्ट्र राज्य.
महोदय,
संजय राठोड तुम्ही चुकलाच, तुम्ही स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना तसेच महाविकास आघाडी सरकारला अडचणीत नाही आणले पाहिजे. तुमचे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संशयित म्हणून नाव समोर येत असताना तुम्ही पंधरा दिवसांनी जनतेच्या समोर आलात, ते ही कोरोनाचे नियम पायदळी तुडवूनच. त्यात तुम्ही सांगितले की,तीस वर्षे मी समाजात काम करतो तसेच चार वेळा आमदार आहे आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझी, कुटुंबाची बदनामी करू नका असेही तुम्ही म्हणालात.
पण संजूभाऊ आपले मतदारसंघात कार्य चांगलेच आहे याचा आम्ही कोणीही विरोध केलेला नाही, आपण मोठ्या मताधिक्याने मतदार संघात निवडून येतात हे सुद्धा तितकेच सत्य आहे आणि तुमची कोणीही बदनामी केलेली नाही, जे पुरावे समोर येत आहेत त्यानुसारच त्याचा जाब सर्व जण विचारत आहे. मागच्या मंत्रिमंडळात आपण महसूल राज्यमंत्री होतात आणि आता कॅबिनेट वनमंत्री आहात, त्यामुळे राज्याचे नेतृत्व करत आहात.
म्हणून सत्तेत असताना आपण काहीही केले तरी चालते असे आपल्या देशात चालत नाही. आपल्या इथे कायदे आहेत, जे सर्वांना समान आहेत आणि मग जर एखाद्या मुलीने आत्महत्या केली आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या काही गोष्टी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आणि गर्भपाताचे पुरावे, फोटोज समोर येत असतील तर तुम्हालाही हे मान्यच करावे लागेल की तुम्ही चुकलेला आहात आणि या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून तुम्ही स्वतः मोठ्या मनाने राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देणे गरजेचे आहे.
मी जेव्हा परळीमध्ये पूजाच्या कुटुंबियांना भेटून आले तेव्हा ते कुटुंब प्रचंड भयभीत आणि दबावात असल्याचे जाणवले, त्यामुळे त्यांना कोणतीही तक्रार करायची नाही परंतु आम्ही कोणतीही चौकशीची मागणी करु नये यालाही त्यांचा कोणताही विरोध नाही.
लॉकडाऊनमध्ये सर्वांचे लाडके असलेले चारित्र्यसंपन्न मुख्यमंत्री यांना अडचणीत आणण्याचं काम स्वतःच्या चुकीमुळे करू नका. तुमची एक चुकीची गोष्ट आणि त्याला पांघरूण घालण्याचे काम जर समाजाची ढाल पुढे करून तुम्ही करत असाल तर महाविकास आघाडी सरकारलासुद्धा ही धोक्याचीच घंटा आहे.
या तपासाची पूर्णपणे निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी तुम्ही स्वतः हा राजीनामा देऊन मंत्रिपदापासून दूर राहून तपासाला सहकार्य करावे आणि जर या केस मध्ये आपण निर्दोष असाल तर पुन्हा एकदा आपण मंत्री म्हणून रुजू व्हावे ही आमचीही इच्छा असेल.परंतु आता ज्या पद्धतीने पोलिसांवर, कुटुंबावर दबाव आणून एखाद्याच्या मृत्यूची केस दाबण्याचा प्रकार अत्यंत केविलवाणा आहे ज्यामुळे तुम्ही स्वतः च पुढे अडकू शकता.
मी काही कोणी राजकारणी नाही परंतु सत्य बाहेर आले पाहिजे, पूजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी महिला म्हणून लढा देत आहे त्यामुळे या प्रकरणात फक्त कोणीतरी राजकारणात करतयं हा आरोप पूर्णपणे खोटा आहे.आता वेळ वाया घालवू नका,चार-पाच महिने पदापासून दूर राहिल्यावर काहीही फरक पडत नसतो. मोठ्या मनाने स्वतः राजीनामा देऊन ,मुख्यमंत्र्यांचा ही मान राखावा ही विनंती.
तृप्ती देसाई,
संस्थापक-अध्यक्षा, भूमाता ब्रिगेड
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.