हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयएनएस विक्रांत नंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांचा 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच सोमय्या यांना इतरांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आता राहिलेला नाही असेही संजय राऊत यांनी म्हंटल. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’पासून टॉयलेट घोटाळ्यात पैसे खाल्ले आहेत. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यातील काही भागात हा घोटाळा केलाय. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि कुटुंबाने हा घोटाळा केला आहे . १०० कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठानकडून खोटी बिलं तयार करून पैसे लाटण्यात आले असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आगामी काळात आम्ही किरीट सोमय्या यांचे आणखी काही घोटाळे बाहेर काढणार आहोत. त्यामुळे त्यांना आता खुलासेच बसत द्यावे लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. दाऊद इब्राहिम याने जस दहशतवादावर बोलू नये, तसच विक्रांत घोटाळा करणाऱ्या सोमय्यांनी आता इतरांच्या भ्रष्टाचारावर बोलू नये…. आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या, असे संजय राऊतांनी म्हंटल
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर केलेल्या 14 ट्विट वरूनही टोला लगावला. शरद पवार यांच्या वर फडणवीस यांनी 14 ट्विट केले त्यात विक्रांत घोटाळ्यावरही एखाद ट्विट केलं असत तर बरं झालं असत, एरवी त्यांना देशभक्ती ची फार कणव येत असते असा चिमटा संजय राऊतांनी फडणवीसांना काढला.