हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या अशा राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, अखेर घोडेबाजार हा झालाच शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीच्या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीतही घोडेबाजार झाला आहे. संजय पवारांच्या पराभवासाठी भाजपने पैशाचा पाऊस पाडला आहे. घोडेबाजारातील घोड्यांमुळे सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत. समोरच्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला, अशी टीका राऊतांनी केली.
संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट मते न देणाऱ्या व फुटलेल्या आपक्षांचीच यादी वाचून दाखवली. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मते दिली नाहीत. ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचे मत बाद केले. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला.
या निवडणुकीतही घोडेबाजार झाला आहे. अपक्ष स्वरूपात असलेल्या घोड्यांवर जास्त बोली लागली लागल्याने घोडे विकले गेले. आम्ही कोणताही व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. संजय पवार यांच्या पराभवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत.
भाजपला पहाटेचा कार्यक्रम करायची सवय आहे
मी फक्त दिलेल ४२ मताची लढत होतो. यात मी विजयी झालोय. वास्तविक या निवडणुकीत दिल्लीची ताकद वापरण्यात आली आहे. मात्र, निकालामुळे शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. या निवडणुकीत काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. काही लोक माझी इतर मतदान बाद करण्याच्या प्रयत्नात होते. निवडणुकीचा निकाल हा पहाटे लागला. भाजपला पहाटेचा कार्यक्रम करण्याची सवय आहार, असा टोलाही राऊतांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले, त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मते घेतली आहेत. पियुषजी 48 मतांनी निवडून आले, आमचे डॉ. बोंडे यांनाही तेवढीच मतं मिळाली. तर आमच्या धनंजय महाडिकांना 41 पाईंट 56 मते मिळाली आहेत. जी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.