हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतून आग लावण्याचं काम बोम्मई करतायेत. ते आमची संस्कृती काढतायेत. बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तोंडं बंद आहेत. शिंदे-फडणवीस सरकार शेपूट घालून बसल आहे. त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला नाही.आमच्यात घुसून मारण्याची हिंमत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राची बदनामी करून चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारनेही हिवाळी अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात आणि बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल खटला दाखल करावा. ज्याप्रकारे महाराष्ट्राविरोधात भाषेचा वापर केला तो आजतागायत कुठल्या सरकारने केला नाही. याची एसआयटी लावताय, त्याला एसआयटी लावताय, याला क्लिनचीट देता, त्याला क्लिनचीट देता. उद्या हे बोम्मईंनाही क्लिनचीट देतील. आणि 20 लाख बांधावांना गुन्हेगार ठरवतील.
राहुल शेवाळे 2024 ला संसदेत दिसणार नाहीत : राऊत
दिशा सालियन प्रकरणात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरणारे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. राहुल शेवाळे म्हणजे देशाचे अॅटर्नी जनरल नाहीत. उद्या ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत. आम्ही 20 वर्ष संसदेत आहोत. आम्ही कायदा बनवणारे आहोत. आम्हीही राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे कायदा आम्हालाही कळतो, असे राऊत यांनी म्हंटले.