हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विरोधात कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून गरळ ओकत आहेत. एक इंचही जमीन देणार नाहीत असे म्हणत आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका घेत नाही. ‘तुम्ही दिल्लीत गेलात तेव्हा तुम्हाला पुन्हा गुंगीचं इंजेक्शन देऊनमहाराष्ट्रात पाठवलं का?, की या विषयावर काही बोलायचं नाही असे सांगितले तसं असेल तर स्पष्ट सांगा,’ असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणविसावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे यांनी केलेल्या क्रांतीचाच भाग एक प्रकारे कर्नाटकात दिसत आहे. आम्हाला बोम्मई काय म्हणतात त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतो हे जास्त महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने बोटचेपी भूमिका घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी याप्रश्नावर हस्तक्षेप केतल्यानंतरही जैसे थे परिस्थिती आहे. ‘इतकी बेअब्रु महाराष्ट्राची बाजूच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती.
सीमाप्रश्न जुना असला तरीही एकमेकांच्या राज्याच्या आदरभाव ठेवून संघर्ष सुरू होता. दोन्ही राज्य भारताचे घटक आहेत. कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातही भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. सीमाप्रश्न आजचा नाही. छगन भुजबळांसोबत तुम्ही तुरुंगात होता म्हणता. मग लाठ्या खालल्या ते दाखवा. तो जोर, तो जोश आता दाखवा. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे. या प्रश्नावर भूमिका घेणार नसाल तर मुख्यमंत्री पदावर बसण्यास पात्र नाही.
मुख्यमंत्र्यांच्या तोंडात कोणी बोळा कोंबला आहे का?
‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे. सर्व विषयांवर बोलता, भूखंडावर आरोप झाले त्यावर तासभर उत्तरे देता. मग महाराष्ट्राच्या सीमावादात बाजूच्या राज्याचे मुख्यमंत्री बोलतात मग तुम्ही बोलत का नाही? मजबुरी काय आहे? तुमची काय अडचण आहे? तुमच्या तोंडात कोणी बोळा कोंबला आहे का? तुम्ही दिल्लीत गेलात तेव्हा तुम्हाला गुंगीचं इंजेक्शन देऊन पाठवलं का, की बोलायचं नाही या विषयावर, अशी टीका राऊतांनी केली.